पॅरिस : जगाचे लक्ष लागून राहिलेल्या पॅरिस ऑलिम्पिक क्रीडोत्सवाच्या पहिल्यावहिल्या तरंगत्या उद्घाटन सोहळ्याला सेन नदीच्या पात्रात काहीशा ढगाळ वातावरणात, पण अमाप उत्साहात सुरुवात झाली.ऑलिम्पिक स्पर्धेच्या परंपरेला छेद देत प्रथमच स्टेडियमऐवजी नदीच्या पात्रात उद्घाटन सोहळा रंगला. खेळाडूंचे संचलनही खास तयार करण्यात आलेल्या ९५ बोटींतून पार पडले. या ‘सेन’दार सोहळ्यासाठी तीन लाख निमंत्रित प्रेक्षक आणि दोन लाख प्रेक्षक काठावर उभ्या केलेल्या तात्पुरत्या गॅलरीत उपस्थित होते. या सोहळ्यासाठी ४५ हजार पोलीस तैनात करण्यात आले होते. सहभागी देशातींल सात हजार खेळाडू उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित होते. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्राँ यांनी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेचे (आयओसी) अध्यक्ष थॉमस बाख यांचे स्वागत केले. सोहळ्यासाठी १०० आंतरराष्ट्रीय पाहुणे उपस्थित होते. संचलनाच्या एका टप्प्यात प्रसिद्ध गायिका लेडी गागाने आपल्या गाण्याने सर्वांना मंत्रमुग्ध केले. खेळाडूंच्या संचलनात ऑलिम्पिकचे जनक असलेल्या ग्रीसला पहिला मान देण्यात आला. त्यानंतर निर्वासितांच्या संघाने संचलन केले. भारताचा क्रमांक ८४वा होता. भारताचा ध्वज पी.व्ही. सिंधू आणि अंचता शरथ कमल यांनी वाहून नेला. संचलनात भारताकडून ७८ खेळाडूंचा सहभाग होता.