दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरू झाली आहे. एकीकडे मतदानाची तारीख जवळ येत आहे, तर दुसरीकडे नेत्यांच्या जीभा सारख्या घसरू लागल्या आहेत. असंच एक वादग्रस्त वक्तव्य भाजपाच्या नेत्यानं केलं आहे. “दिल्लीतील शाहीन बागेत सीएए, एनआरसीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनात बहुतांश लोक पाकिस्तानी आणि बांगलादेशी आहे,” भाजपाचे नेते खासदार राहुल सिन्हा यांनी म्हटले आहे.

केंद्र सरकारने सुधारित नागरिकत्व कायदा लागू केला. या कायद्याविरोधात दिल्लीतील शाहीन बाग येथे दीड महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. शाहीन बागेतील आंदोलनावर भाजपाकडून टीका केली जात आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात हा मुद्दा आला असून, याविषयी बोलताना भाजपाचे नेते खासदार राहुल सिन्हा यांची जीभ घसरली. “दिल्लीतील शाहीन बाग येथे सुरू असलेल्या आंदोलनात बसलेले बहुतांश लोक पाकिस्तान आणि बांगलादेशातून आलेले आहेत,” असं विधान सिन्हा यांनी केलं आहे.

देशाला तोडणारा मंच : रविशंकर प्रसाद

“शाहीन बाग येथे सुरू असलेलं आंदोलन सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात नाही, तर ते नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आहे. या कायद्यावरून जनतेची दिशाभूल केली जात आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रचलेला हा डाव आहे. त्यामुळे शाहीन बाग हा देशाला तोडणारा मंच आहे,” अशी टीका केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केली.

आणखी वाचा – केंद्रीय मंत्र्याचं वादग्रस्त विधान; निवडणूक आयोगाने घेतली दखल

‘देश के गद्दारों को..’

भाजपाचे उमेदवार मनीष चौधरी यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत केंद्रीय राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी वादग्रस्त घोषणा दिली होती. रिठला विधानसभा क्षेत्रात झालेल्या या सभेत भाषण करताना अनुराग ठाकूर यांनी ‘देश के गद्दारों को..’ घोषणा केली. त्यानंतर सभेला उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी ‘गोली मारो ** को’ अशी घोषणाबाजी केली होती. याप्रकरणी दिल्लीच्या निवडणूक कार्यालयाने त्यांच्या वादग्रस्त घोषणेची दखल घेत त्या संदर्भात अहवाल मागवला आहे.