जम्मू-काश्मीरसाठी वेगळे संविधान ही एक मोठी चूक होती, असे वक्तव्य राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवल यांनी केले आहे. भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड केली जाऊ शकत नाही, यावरही त्यांनी भर दिला. एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. सर्वोच्च न्यायालयात कलम ३५ अ च्या संवैधानिक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सध्या सुनावणी सुरू आहे. नेमके त्याचवेळी डोवल यांनी हे वक्तव्य केले आहे.

कलम ३५ अ नुसार जम्मू-काश्मीरमधील नागरिकांना काही विशेष अधिकार देण्यात आले आहेत. देशाचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावर लिहिण्यात आलेल्या एका पुस्तकाच्या प्रकाशनावेळी ते बोलत होते. वल्लभभाई पटेल यांनी देशाचा पाया भक्कम करण्यासाठी महत्वाचे योगदान दिले असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

ना सार्वभौमत्वाला कमकुवत केले जाऊ शकत नाही ना त्याची चुकीची व्याख्याही केली जाऊ शकत नाही. जेव्हा इंग्रज भारताला सोडून गेले होते. कदाचित त्यांना जाताना सार्वभौम भारत नको होता, असे डोवल म्हणाले. इंग्रजांच्या या कुटील डावाची योजना कदाचित पटेल यांना त्यावेळी समजली असेल. सर्व राज्यांचे एकत्रिकरण करण्यापुरतेच पटेल यांचे योगदान नव्हते तर त्याहून अधिक त्यांनी या देशाला दिले असल्याचे त्यांनी म्हटले.