scorecardresearch

“शिंदे गट हा राजकीय पक्षच नाही, ठाकरे गटच मूळ शिवसेना ” देवदत्त कामत यांचा निवडणूक आयोगासमोर युक्तिवाद

शिवसेना कुणाची यावर निवडणूक आयोगासमोर जोरदार युक्तिवाद

“शिंदे गट हा राजकीय पक्षच नाही, ठाकरे गटच मूळ शिवसेना ” देवदत्त कामत यांचा निवडणूक आयोगासमोर युक्तिवाद
काय म्हटलं आहे ठाकरे गटाच्या वकिलांनी?

शिवसेनेची मूळ प्रतिनिधी सभा ही उद्धव ठाकरे यांच्याकडेच आहे. असा युक्तिवाद देवदत्त कामत यांनी निवडणूक आयोगासमोर केला. शिंदे गटाने घेतलेली प्रतिनिधी सभा घटनाबाह्य आहे. मूळ प्रतिनिधी सभा बरखास्त कशी काय होईल? असाही प्रश्न ठाकरे गटाचे वकील युक्तिवाद देवदत्त कामत यांनी विचारला. एवढंच नाही तर शिंदे गट म्हणजे राजकीय पक्षच नाही असाही युक्तिवाद ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी केला. ठाकरे गट हीच खरी शिवसेना आहे असंही कामत यांनी सांगितलं. एक तास कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. त्यानंतर देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला.

शिवसेना कुणाची यावर युक्तिवाद

शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा यावर १० तारखेपासूनचीही ही तिसरी सुनावणी आहे. १० तारखेला पहिल्यांदा युक्तिवाद झाला. त्यानंतर १७ तारखेला झाला त्यानंतर आज युक्तिवाद होतो आहे. शिंदे गटावर जोरदार आक्षेप ठाकरे गटाकडून घेण्यात आले. शिंदे गटाने जी कार्यकारिणी नेमली आहे ती बेकायदेशीर आहे असंही देवदत्त कामत यांनी सांगितलं. घटनेला अनुषंगूनच शिवसेनेची वाटचाल होते आहे. मूळ प्रतिनिधी सभा बरखास्त होऊच शकत नाही असा जोरदार युक्तिवाद देवदत्त कामत यांनी केला.

उद्धव ठाकरेंना दिलेल्या आव्हानाला उत्तर

उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेना पक्ष प्रमुख हे पद तयार केलं. हे पद त्यांनी परस्पर तयार केलं. त्यामुळे हे पदच घटनाबाह्य असल्याचा युक्तिवाद शिंदे गटाकडून करण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना आता ठाकरे गटानेही शिंदे गट म्हणजे शिवसेना नाही असं ठासून सांगितलं आहे. तसंच प्रतिनिधी सभा बरखास्त होऊ शकत नाही.

मनिषा कायंदे काय म्हणाल्या?


ठाकरे गटाच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे म्हणाल्या की निवडणूक आयोगाने जर मेरिटचा विचार केला तर निर्णय आमच्या बाजूने लागेल. कारण शिवसेनेचा इतिहास, परंपरा आणि वारसा आमच्याकडेच आहे. त्यामुळे निर्णय आमच्याच बाजूने लागेल असा विश्वास वाटतो असं मनिषा कायंदे यांनी म्हटलं आहे.

एकनाथ शिंदे यांच्या प्रतिनिधी सभेवरच प्रश्न

एकनाथ शिंदे यांची प्रतिनिधी सभा, त्यांचं मुख्यनेते पद, त्यांनी केलेल्या नियुक्त्या यावरच ठाकरे गटाने प्रश्न उपस्थित केले आहेत. आमदार आणि खासदार ही गोष्ट लक्षात न घेता राजकीय पक्ष याचा अर्थ लक्षात घ्यावा अशी विनंती ठाकरे गटाने केली आहे. आता या सगळ्यात पुढे काय काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-01-2023 at 19:23 IST

संबंधित बातम्या