तब्बल १५०० किमी अंतर पार करून मुलाला पाहण्यासाठी गेलेल्या मुलीच्या बापाने सॅलरी स्लिप मागीतली अन् तिथे कार्यक्रमात एकच गोंधळ सुरू झाला. नवरीमुलीकडील सात ते आठ जणांना मुलाकडीत लोकांनी डांबून ठेवलं. तब्बल पाच दिवसानंतर पोलिसांनी त्यांची सुटका केली. ही घटना ऋषिकेशमध्ये घडली आहे.

दैनिक भास्करच्या वृत्तानुसार, उत्तराखंडमधील बागबेडाहून विवाहासाठी आलेल्या वधू पक्षातील लोकांची पोलिसांनी मंळवारी सुटका केली. मुलगा इंजिनिअर असल्याचे वरपक्षाकडील लोकांनी सांगितले होते. परंतु वधूपित्याने मुलाला सॅलरी स्लिप मागताच वरपक्षाकडील लोकांना त्यांच्यासोबत गैरवर्तन केले. हुंडा मागू लागले. हा सगळा प्रकार पाहून नवरीने विवाह करण्यास स्पष्ट नकार दिला. त्यानंतर मुलाकडील लोक नाराज झाले. त्यांनी मुलीकडील लोकांना आपल्या घरात डांबून ठेवले. नववधूने सोमवारी रात्री स्वत:ची सुटका करून ऋषिकेश पोलिस स्टेशन गाठले. पोलिस स्टेशनमध्ये सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकत सर्वांची सुटका केली.

पीडित मुलीसह तिच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून ऋषिकेश पोलिस स्टेशनमध्ये वरपक्षाकडील नागरिकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. वरपक्षाकडील नागरिक अद्याप फरार आहेत. पोलिस संरक्षणात पीडित मुलीसह तिच्या नातेवाईकांना मंगळवारी रात्री रवाना करण्यात आले आहे.