पीटीआय, नवी दिल्ली
कोलकात्यामधील आर. जी. कर वैद्याकीय महाविद्यालय व रुग्णालयात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्याप्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेतली आहे. याप्रकरणी न्यायालयाने मंगळवार, २० ऑगस्टला सुनावणी होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आलेल्या सूचीनुसार, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. जे. बी. पारडीवाला आणि न्या. मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होईल. ‘आर जी कर वैद्याकीय महाविद्यालय व रुग्णालय, कोलकाता येथे प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर कथित बलात्कार व हत्या घटना आणि संबंधित मुद्दे’ या शीर्षकाखाली हे प्रकरण सूचिबद्ध करण्यात आले आहे. प्रशिक्षणार्थीडॉक्टरचा मृतदेह ९ ऑगस्टला रुग्णालयामध्ये आढळला होता आणि मृतदेहावर गंभीर जखमांच्या खुणा होत्या. दुसऱ्या दिवशी याप्रकरणी एका स्वयंसेवकाला अटक करण्यात आली. मात्र, प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करण्यात आल्याच्या संशयावरून शिकाऊ डॉक्टरांमध्ये संतापाची लाट उसळली. त्यापाठोपाठ मोठ्या प्रमाणात जनक्षोभही उसळला. तेव्हापासून या प्रकरणावरून पश्चिम बंगालमध्ये निदर्शने सुरू आहेत. कलकत्ता उच्च न्यायालयाने १३ ऑगस्टला एका आदेशाद्वारे या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला होता. सीबीआय चौकशी सुरू असतानाच आता सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून याचिका दाखल करून घेत या प्रकरणात लक्ष घातले आहे.
माजी प्राचार्यांची तिसऱ्या दिवशी चौकशी
आर. जी. कर वैद्याकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष यांची सीबीआयकडून रविवारी सलग तिसऱ्या दिवशी चौकशी करण्यात आली. घोष रविवारी सीबीआयसमोर हजर झाले असता त्यांना फोन कॉलचे तपशील देण्यास सांगितल्याची माहिती सीबीआय अधिकाऱ्याने दिली. तसेच मोबाइल फोन सेवा प्रदात्यांशीही संपर्क साधण्यात येणार आहे.