Ayatollah Seyyed Ali Khamenei जगाचं लक्ष लागून राहिलेल्या अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर आली आहे.अमेरिका आणि इस्रायलनं केलेल्या हल्ल्यात इराणेचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला आहे. खामेनी यांचा मृतदेह सापडला असल्याची माहिती इस्रायलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रॉयटर्सला दिली आहे. ANI ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. अमेरिका आणि इस्रायलकडून इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या कार्यालयांजवळ क्षेपणास्त्र डागण्यात आली. तसंच त्यांच्या घराजवळ बंकर बस्टिंग क्षेपणास्त्र डागण्यात आलं. त्यामुळे खामेनी यांचा मृत्यू झाल्याचा दावा इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी केला.

इतिहासातील क्रूर माणसाचा अंत-डोनाल्ड ट्रम्प

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केलेल्या घोषणेला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुजोरा दिला. इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांचा मृत्यू झाल्याची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. इतिहासातील अत्यंत वाईट व्यक्तींमधील एक असलेल्या खामेनी यांचा मृत्यू झाल्याचं ट्रम्प यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय. खामेनी यांचा मृत्यू हा केवळ इराणी जनतेसाठीच नाही तर अमेरिकन नागरिकांसह जगभरातील पीडितांसाठी न्याय असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय. तसंच, इराणी लोकांसाठी त्यांचा देश परत मिळवण्याची ही एकमेव मोठी संधी आहे. असंही ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

इराणच्या वृत्तवाहिनीनेही दिलं खामेनींच्या मृत्यूचं वृत्त

डोनाल्ड ट्रम्प आणि नेत्यानाहू यांच्या दाव्यांनंतर आता इराणची सरकारी वृत्तसंस्था IRNA आणि प्रमुख वृत्त वाहिनी प्रेस टीव्ही यांनीही खामेनी यांच्या मृत्यूचं वृत्त दिलं आहे. ज्यावेळी त्यांच्या कार्यालयावर क्षेपणास्त्रं डागण्यात आली तेव्हा खामेनी आपल्या कार्यालयातच उपस्थित होते. अयातुल्ला खामेनी अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या संयुक्त कारवाईत ठार झाले आहेत अशी बातमी या दोहोंनी दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा करत इतिहासातील सर्वात क्रूर व्यक्तीचा अंत झाला असं म्हणत पोस्ट लिहिली होती. तर आम्ही इराणच्या सर्वोच्च नेत्याला ठार केलं आहे असा दावा नेत्यानाहू यांनी केला.

कोण होते अयातुल्ला खामेनी?

१९८९ मध्ये अयातोल्ला रुहोल्ला खामेनी यांच्या मृत्यूनंतर त्यांनी इराणच्या सर्वोच्च नेतेपदाची सूत्रं अयातुल्ला खामेनींनी स्वीकारली. जवळपास तीन दशकांपासून खामेनी हे इराणवर एकहाती वर्चस्व गाजवत होते. इराणमधील एक अख्खी पिढी त्यांच्या नेतृत्वाशिवाय देशाच्या विकासाची कल्पनाही करीत नाही. खामेनी हे इराणचे प्रमुख होते, पण त्याचबरोबर ते इराणी रिव्होल्यूशनरी गार्ड कोअरचे (आयआरजीसी) कमांडर-इन-चीफही होते, या सर्व अधिकारांमुळे खामेनी हे इराणचे सर्वात शक्तिशाली नेते झाले होते. आता त्यांचा मृत्यू झाला आहे.

‘धर्मगुरू ते शक्तिशाली नेता’

  • १९३९ मध्ये इराणच्या मशहद या शहरातील एका धार्मिक कुटुंबात खामेनी यांचा जन्म झाला.
  • त्यांनी मशहदमधील मदरशांमध्ये धार्मिक शिक्षण घेतले आणि नंतर ते पुढील शिक्षणासाठी कोम शहरात गेले.
  • १९६२ पासून खामेनी यांनी इराणचे तत्कालीन सम्राट मोहम्मद रझा पहलवी (शहा) यांच्या विरोधात राजकीय हालचाली सुरू केल्या.
  • अयातुल्ला अली खामेनी यांना इराणच्या इस्लामी क्रांतीच्या आधी अनेकदा तुरुंगवासही भोगावा लागला.
  • १९६० च्या दशकात ते काही काळ देशाबाहेर हद्दपारही झाले होते, पण १९७९ च्या क्रांतीनंतर ते पुन्हा इराणमध्ये परतले.
  • इराणच्या क्रांतीनंतर खामेनी यांना सत्तेच्या केंद्रस्थानी आले. त्यांनी इराणच्या क्रांतिकारी परिषदेवर काम केले.
  • इराणच्या संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर खामेनी यांनी देशात इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कोअरची स्थापना करण्यातही भाग घेतला.
  • एका भीषण स्फोटात गंभीर जखमी झाल्यानंतर खामेनी यांचा उजवा हात कायमस्वरुपी अकार्यक्षम झाला.