पश्चिम बंगालमध्ये ३० सप्टेंबर रोजी पोटनिवडणुका होणार आहेत. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी भवानीपूर मतदारसंघातून निवडणूक लढवत असून त्यांच्याविरोधात भाजपाने प्रियंका टिबरेवाल यांना उमेदवारी दिली आहे. भवानीपूर मतदारसंघ जिंकण्यासाठी तृणमूल काँग्रेस आणि भाजपाने आपली सर्व ताकद पनाला लावली आहे. भाजपाला वाघ संबोधत, “वाघाच्या तोंडाला रक्त लागलंय, त्यामुळे हा वाघ ममता बॅनर्जींना भवानीपूरमध्ये कठोर आव्हान देईल,” असं भाजपाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष डॉ. सुकांता मजुमदार यांनी म्हटलंय.

“नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जींना पराभूत करून आम्ही विजयाची चव चाखली आहे. नंदीग्राममध्ये उत्कृष्ट लढत दिल्याबद्दल मी आमचे नेते सुवेंदू अधिकारी यांचे कौतुक करू इच्छितो. आता भवानीपूरमध्ये पोटनिवडणूक आहे. हा मतदारसंघ इतर मतदार संघांप्रमाणेच आहे. पण इथं एक गोष्ट वेगळी आहे कारण मुख्यमंत्री बॅनर्जी स्वतः या जागेवरून निवडणूक लढवत आहेत. नंदीग्राममध्ये आम्ही जी चव चाखली तीच चव चाखण्याचा आम्ही पुन्हा प्रयत्न करू. ज्या वाघाने एकदा रक्ताची चव चाखली, तो वाघ कधीच तृप्त होत नाही,” असं मजुमदार म्हणाले. न्यूज १८ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

“प्रदेश भाजपची खरी संपत्ती ही आमचे कार्यकर्ते आहेत. बंगालमध्ये अधर्म ही सध्याची सर्वात मोठी चिंता आहे. मी बंगालमध्ये पुढील आव्हानांना सामोरे जाण्यास तयार आहे. भाजपा प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठिशी उभा राहील, त्यांचं मनोबल वाढवेल,” असंही मजुमदार म्हणाले.

दरम्यान, भवानीपूरमध्ये ३० सप्टेंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. मतमोजणी ३ ऑक्टोबर रोजी केली जाईल. तसेच ३० सप्टेंबरलाच पश्चिम बंगालच्या समसेरगंज, जंगीपूर आणि पिपली मध्येही पोटनिवडणूक होणार आहे. तसेच निवडणूक आयोगाने कोविड -१९ ची परिस्थिती पाहता इतर ३१ जागांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.