मुंबई : गाझामधील इस्रायली सैन्याच्या हल्ल्यात मारली गेलेली पाच वर्षांची पॅलेस्टिनी मुलगी हिंद रजाब हिच्या सत्य घटनेवर आधारित ऑस्कर-नामांकित ‘द व्हॉइस ऑफ हिंद रजाब’ या चित्रपटाच्या भारतातील प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाने (सीबीएफसी) कोणतीही कपात न करता चित्रपटाला प्रमाणपत्र दिले असून, तो १९ जून रोजी देशभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

मार्च महिन्यात चित्रपट प्रदर्शित होणे अपेक्षित होते. मात्र सेन्सॉर प्रमाणपत्राच्या प्रक्रियेमुळे त्याचे प्रदर्शन रखडले होते. भारतासह पाकिस्तान, श्रीलंका, मालदीव, अफगाणिस्तान आणि बांगलादेशमध्ये चित्रपटाच्या वितरणाचे हक्क जय विरात्रा एंटरटेनमेंट लिमिटेडकडे आहेत. वितरक मनोज नंदवाना यांनी यासाठी ‘सीबीएफसी’चे आभार मानले आहेत.

हृदयद्रावक कहाणी ट्यूनिशियाच्या प्रसिद्ध दिग्दर्शिका कौथर बेन हानिया यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात जानेवारी २०२४ मध्ये गाझा शहरातून कुटुंबासह निघालेल्या हिंद रजाबची हृदयद्रावक कहाणी मांडण्यात आली आहे. गोळीबारात कुटुंबातील सर्व सदस्य मृत्युमुखी पडले होते. मदतीसाठी केलेल्या दूरध्वनी संपर्कादरम्यान हिंदने केलेली आर्त विनवणी जगभरात चर्चेचा विषय ठरली होती.