देशाच्या नियंत्रण रेषेवरील परिस्थितीवरुन राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढवला आहे. काँग्रेसच्या राजवटीत चीनने देशाच्या हजार किलोमीटर जमिनीवर अतिक्रमण केले नाही. तसे असते तर आपले पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी न घाबरता सत्य स्वीकारून राजीनामा दिला असता. पण भाजपावाले सत्य लपवण्याचा प्रयत्न करत आहेत, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. राजस्थान काँग्रेस प्रशिक्षण शिबिराच्या समारोपप्रसंगी राहुल गांधी बोलत होते.

राहुल गांधी यांनी हिंदुत्वाबाबत भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर पुन्हा निशाणा साधला आणि काँग्रेसची लक्ष्मणरेखा सत्य तर भाजपाची लक्ष्मणरेखा सत्ता असल्याचं त्यांनी म्हटलं. “जे हिंदुत्वाच्या विचारसरणीचे पालन करतात ते कोणाच्याही समोर झुकतात. या लोकांनी इंग्रजांपुढे डोके टेकवले. आता ते पैशापुढे नतमस्तक होतात, कारण त्यांच्या हृदयात सत्य नाही,” असे राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधी यांनी स्वातंत्र्य चळवळीत जवाहरलाल नेहरूंनी नैनी तुरुंगात घालवलेले दिवस आठवले. नेहरूंनी सुटका करताना तुरुंगवासीयांचे आभार मानताना त्यांनी लिहिले की, तुरुंगवासात त्यांना खूप काही शिकायला मिळाले. नेहरूंच्या या विधानात कुठेही द्वेष आणि सूडभावना नाही, असे राहुल गांधी म्हणाले. तर सावरकरांनी आपल्या पुस्तकात नमूद केले आहे की, जेव्हा त्यांच्या पाच साथीदारांनी मिळून एका मुस्लिम तरुणाला काठ्यांनी मारहाण केली तेव्हा त्यांना सर्वात जास्त आनंद झाला. पाच जणांनी मिळून एका व्यक्तीला मारहाण केल्याने ही एकतर्फी लढत असल्याचे राहुल गांधी म्हणाले.

“अनेक वर्षे तुरुंगात राहूनही नेहरूंच्या मनात द्वेष नव्हता, असेही ते म्हणाले. दुसरीकडे ती व्यक्ती लोकांसोबत मिळून प्रहार करते, कारण ते घाबरट होते. ज्यांना उभे राहून समस्यांना सामोरे जावे लागते ते हिंदू आहेत. समस्येसमोर घाबरून डोके टेकवणाऱ्यांची विचारधारा म्हणजे हिंदुत्व,” असे राहुल गांधी म्हणाले. याआधी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हुकूमशाही निर्णयांवरुन टीका केली होती. नरेंद्र मोदींच्या चुकीच्या निर्णयांपुढे मान झुकवणारी जनता म्हणजे हिंदुत्व असे त्यांनी म्हटले होते.

“एकदा काँग्रेस कार्यकर्ता परिषदेत मी घरातून पळून गेलेला कोणी उपस्थित आहे का, असे विचारले असता कोणीही हो असे उत्तर दिले नाही. हाच प्रश्न आरएसएसच्या बैठकीत विचारला तर प्रत्येकाचे उत्तर होय असेच असेल. जो जबाबदारी पार पाडू शकत नाही आणि ज्याच्या मनात प्रेम नाही तोच पळून जातो,” असे राहुल गांधी म्हणाले.