उत्तर प्रदेशमध्ये भाजपाचे आमदार कुलदिप सिंह सेंगर प्रकरणी योगी सरकार संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयात सादर केलेल्या अहवालात उन्नाव सामुहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी आमदार सेंगरला सध्या तरी सरकारने क्लीन चिट दिली आहे. तर न्यायालयात याप्रकरणी दोन्ही पक्षांनी म्हणणे मांडले असून उद्या (दि.१३ एप्रिल) उच्च न्यायालय याप्रकरणी आदेश देईल.

उत्तर प्रदेशच्या महाधिवक्तांनी अलाहाबाद न्यायालयात दाखल केलेल्या अहवालात म्हटले आहे की, आमदार कुलदिप सिंह सेंगर यांच्याविरोधात पुरेसे पुरावे नाहीत. पुरावे प्राप्त झाल्यानंतर त्यांच्याविरोधात कारवाई होईल. कायद्यानुसार आतापर्यंतची कारवाई झाली आहे.

उच्च न्यायालयाने सुनावणीनंतर याप्रकरणी आपला निकाल राखीव ठेवला आणि आता ते शुक्रवारी दोन वाजता आपला निकाल देतील. उच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या या उत्तरावर नाराजी व्यक्त केली.

यापूर्वी बुधवारी रात्री आमदार सेंगर हे पोलीस अधिक्षकांच्या निवासस्थानी पोहोचले. सुरूवातीला ते शरण येण्यासंबंधी चर्चा करण्यासाठी आल्याची चर्चा होती. परंतु, नंतर आमदारांनी सांगितले की, आपण इथेच असून फरार होणार नसल्याचे सांगायला आलो होतो, असे म्हटले.

दरम्यान, उच्च न्यायालयाने बुधवारी सरकारला एका तासांत सेंगरला अटक करू शकता का असा जाब विचारला होता. सरकारने सेंगर यांच्याविरोधात पर्याप्त पुरावे नसल्याचे आपल्या उत्तरादाखल न्यायालयाला सांगितले.