UP couple jumps from cafe: पिझ्झा कॅफेत बसलेल्या तरुण आणि तरुणीने दुसऱ्या मजल्यावरुन खाली उडी मारल्याने दोघेही जखमी झाले. हिंदू संघटनेच्या सदस्यांनी दोघांना जात विचारल्यानंतर घाबरुन त्यांनी उडी घेतली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. शाहजहानपूर जिल्ह्यात शनिवारी (२४ जानेवारी) सायंकाळी ही घटना घडली.

दुसऱ्या मजल्यावरुन घेतली उडी

पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, पिझ्झा कॅफेच्या दुसऱ्या मजल्यावरुन उडी घेतल्याने दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बरेली येथील एका इमारतीत हा पिझ्झा कॅफे असल्याची माहिती पोलिसांनी पीटीआयला दिली आहे.

हिंदू संघटनेच्या सदस्यांनी जात विचारली

हिंदू संघटनेचे काही सदस्य शनिवारी सायंकाळी कॅफेत आले. कॅफेत २१ वर्षीय तरुण आणि १९ वर्षीय तरुणी एकत्र बसले होते. संघटनेच्या सदस्यांनी दोघांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली, अशी माहिती समोर आली आहे. दोघांनी नूडल्स मागवले होते व ऑर्डरीची वाट पाहत होते. याचवेळी आलेल्या संघटनेच्या लोकांनी त्यांना जात विचारली, अशी माहिती दोघांनी पोलिसांना दिली आहे.

व्हिडिओ व्हायरल

या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला असून, घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केल्याचे दिसून येत आहे. जखमी दोघांना काहीजण रुग्णालयात घेऊन जाताना दिसत आहेत.

काहींनी शूट केला व्हिडिओ

महिला आणि सोबतच्या पुरुषाने ते दोघेही हिंदू असल्याचे सांगितले. यानंतर संघटनेच्या काही लोकांनी त्याचे चित्रीकरण करण्यास सुरुवात केली, अशी माहिती पोलिसांनी पीटीआयला दिली आहे. यामुळे घाबरलेल्या तरुणाने शेजारीच असणारी खिडकी उघडून खाली उडी घेतली. त्याच्यापाठोपाठ महिलेनेही उडी घेतली.

अद्याप तक्रार दाखल नाही

घटेनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक राजेश द्विवेदी घटनास्थळी दाखल झाले व घटनेचा तपास सुरु करण्यात आला आहे. दरम्यान, याप्रकरणी अद्याप कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. तक्रार प्राप्त झाल्यानंतर याप्रकरणी कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिस अधीक्षक राजेश द्विवेदी म्हणाले.