इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू कुठे आहेत यावरून तसेच त्यांच्या प्रकृतीवरुन विशेषत: सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं होतं. तेल अविवमध्ये १४ मार्चला झालेल्या एका महत्त्वाच्या लष्कराच्या बैठकीला नेतान्याहू अनुपस्थित राहिले. त्यानंतर ते जिवंत आहेत की नाहीत, याविषयी उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. एवढंच नाही नेतान्याहूंचा मृत्यू झाला आहे असाही दावा काही पोस्टकर्त्यांनी केला होता. यानंतर आता बिन्यामिन नेतान्याहूंचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत त्यांनी इराणची खिल्ली उडवली आहे.
इराणच्या IRGC ने काय म्हटलं होतं?
इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) इस्रायली पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांचा पाठलाग सुरू ठेवण्याची शपथ घेतली असून, पश्चिम आशियातील वाढत्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर ‘ते जिवंत असतील तर ते लक्ष्य राहतील’ असे म्हटले आहे. एका निवेदनात ‘आयआरजीसी’ने नेतान्याहू यांना ‘गुन्हेगार झायनिस्ट पंतप्रधान’ असे संबोधले आहे. ‘ते जिवंत राहिले तर त्यांचा पाठलाग करून हत्या करण्याचे प्रयत्न सुरूच राहतील’ असे म्हटले आहे. ‘जर गुन्हेगार आणि बालहत्यारा नेतान्याहू अजूनही जिवंत असेल, तर आम्ही त्यांचा पाठलाग सुरू ठेवू’, असं म्हटलं आहे. दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवर नेतान्याहूंचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
नव्या व्हिडीओत काय दिसतं आहे?
एक्सवर नेतान्याहूंनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी इराणकडून आलेल्या नेतान्याहूंच्या मृत्यूच्या अफवांची खिल्ली उडवली आहे. I am Dead For Coffee असं म्हणत ते कॉफीचा आस्वाद घेताना दिसत आहेत. नेतान्याहू हे एका कॉफी शॉपमध्ये कॉफीचा आस्वाद घेत आहेत. त्यांच्या हातात कॉफीचा कप आहे. कॉफीचा घोट घेत त्यांनी इराणच्या दाव्याची खिल्ली उडवली आहे. नेतान्याहू यांचा हा व्हिडीओ व्हायरलही झाला आहे. यावर विविध प्रतिक्रियाही येत आहेत, अनेकजण हा व्हिडीओ रिपोस्टही करत आहेत.
नेतान्याहू यांच्या एक्स पेजवरच व्हिडीओ
नेतान्याहू यांच्या एक्स पेजवरच हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यामध्ये इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू हे कॉफीचा आस्वाद घेताना दिसत आहेत. दरम्यान इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांच्या मृत्यूच्या अफवा जेव्हा रविवारी समोर आल्या तेव्हाच इस्रायलने खोडून काढल्या. तसंच नेतान्याहू यांनी इस्रायल सोडलेला नाही असंही स्पष्ट करण्यात आलं होतं. आता त्यांचा जो व्हिडीओ समोर आलाय त्यात ते कॉफी घेत इराणची खिल्ली उडवत आहेत हे दिसून येतं आहे.
