पश्चिम बंगालमध्ये १५ वर्षांपासून असलेली ममता बॅनर्जींची सत्ता उलथवून टाकत भाजपाने घवघवीत यश मिळवलं आहे. भाजपाने जे करुन दाखवलं आहे त्याचा अंदाज एक्झिट पोल्समध्ये व्यक्त करण्यात आला होता. १८० हून अधिक जागा मिळवत भाजपाने बंगालमध्ये सत्ता खेचून आणली आहे. यानंतर आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलंय?

आजचा दिवस हा सगळ्यांसाठी एक ऐतिहासिक दिवस आहे. मी बंगालमध्ये गेलो होतो तेव्हा मला पत्रकार परिषदेत तिथल्या एका पत्रकाराने विचारलं होतं की ममतादीदी म्हणतात भाजपा आणि त्यांचे नेते बंगालच्या बाहेरचे आहेत. बाहेरचे लोक मतं मागतात. पण खरा बंगालचा पक्ष कुठला ते ममतादीदींना दाखवून दिलं बंगालचा खरा पक्ष भाजपाच आहे. बंगालच्या लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास दाखवला आणि बंगालमध्ये महापरिवर्तन करुन दाखवलं. ते इतकं आहे की दोन तृतीयांश संख्याबळ भाजपाला मिळते आहे. बंगाल, आसाम, पुद्दुचेरीमधला विजय मोदींवरच्या विश्वासाचा विजय आहे.

बंगालच्या लोकांनी कुशासनातून राज्याला बाहेर काढलं-फडणवीस

आजही देशात जनतेला एकच गोष्टी माहीत आहे. ती गोष्ट म्हणजे मोदी है तो मुमकिन है. बंगालला कुशासनातून बाहेर काढण्याचं काम जनतेने केलं आहे. ३० वर्षे काँग्रेस, ३६ वर्षे कम्युनिस्ट आणि या दोघांपेक्षा खतरनाक म्हणजे ममतादीदींचं शासन. बंगाल देशातलं पहिलं औद्योगिक राज्य होतं. सात हजार इंडस्ट्री तिथून सोडून गेल्या. बंगालची अवस्था जंगलराज झाली होती. पण माननीय मोदींनी जे व्हिजन मांडलं, जो आशेचा किरण दाखवला त्यावर लोकांनी विश्वास दाखवला. जनतेला हा विश्वास बसला की बंगालचं परिवर्तन कुणी करु शकतं तर त्या व्यक्तीचं नाव नरेंद्र मोदी हेच आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

मोदींवरचा विश्वास बंगालच्या जनतेने मतपेटीतून दाखवला-फडणवीस

मोदींवरचा विश्वास जनतेने मतपेटीतून दाखवला आहे. आपले मास्टर स्ट्रॅटेजिस्ट आणि आधुनिक राजकारणातले चाणक्य अमित शाह यांनी ज्या प्रकारे योजना तयार केली आणि आपलं नेतृत्व काय आहे ते दाखवून दिलं. तसंच आपले राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीनजी, आपले नेते सुवेंदू अधिकारी यांच्यासह मी सगळ्यांचं अभिनंदन करतो. बंगलचा विजय हा केवळ एका राज्याचा विजय नाही. बंगालचा विजय हा भारतात होणारी घुसखोरी, भारतावर होणारे हल्ले यापासून भारताला वाचवणारा विजय आहे. ज्याप्रमाणे ममतादीदींचं सरकार बांगलादेशचे घुसखोर बंगालमध्ये आणायचं आणि भारतात त्यांचा मुक्त संचार करायचे, आमचा रोजगार ते लोक खायचे. तसंच भारताच्या एकतेला, अखंडतेला धोका निर्माण करायचे. बंगाल म्हणजे आवो जाओ घर तुम्हारा और पकाओ बिर्यानी तो मुर्गा हमारा असं शासन होतं. भाजपाच्या कार्यकर्त्याला तुम्ही थांबवू शकत नाही हे दाखवणारा विजय आहे. आजचा विजय हा देशाच्या दृष्टीनेही महत्वाचा आहे. आसामचा विजय अपेक्षित होताच. पण जेव्हापासून आसाममध्ये भाजपाचं सरकार आलं तेव्हापासून आसाम देशाचं ग्रोथ इंजिन झालं आहे. त्याप्रमाणेच बंगालही विकासाचं इंजिन म्हणून काम करताना दिसेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. आजचा विजय उत्सव हा फक्त विजयाचा नाही, हा विजय भारताचा विजयोत्सव आहे.