अमेरिका-इस्रायल यांनी इराण विरोधात पुकारलेल्या युद्धामुळे फक्त पश्चिम आशियाच नाही तर संपूर्ण जगावर संकट ओढवले आहे. इराणनजीक असलेल्या होर्मुझ सामुद्रधुनीतून जगभरात तेल आणि वायूचा पुरवठा होत असतो. यासाठी या भागातून अनेक देशांची मालवाहू जहाजे जात असतात. युद्धामुळे या जलमार्गावरील जहाज आणि त्यावरील नाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. १ मार्च रोजी ओमानच्या खासाबा बंदराजवळील स्काय लाईट या तेलाच्या टँकरवर क्षेपणास्त्र हल्ला झाला. यातून आठ भारतीय खलाशी वाचले. मात्र मृत्यूला चकवणाऱ्या या खलाशांना अद्याप घरी येता आलेले नाही.
१ मार्च रोजी झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात जहाजाचा कॅप्टन, बिहारचा आशिष कुमार ठार झाला. तर राजस्थानचा दलिप सिंग बेपत्ता आहे. उरलेले आठ भारतीय नागरिक खासाब विमानतळावर एका आठवड्यापेक्षा जास्त काळ अडकून पडले आहेत. विमानतळावरील अतिथी कशात ते मायदेशी परतण्याची वाट पाहत आहेत.
ओमानमध्ये अडकून बसण्याचे कारण काय?
स्काय लाईट जहाजावर क्षेपणास्त्र आदळल्यानंतर खलाशांचे सामान जळाले. यात त्यांचा पासपोर्ट, व्हिसा आणि त्यांचे ओळखपत्र नष्ट झाले. यामुळे या आठ खलाशांना आंतरराष्ट्रीय प्रवास करण्यास अडचणी येत आहेत. सद्यस्थितीत खासाब विमानतळावर हे खलाशी आऊटपास नामक कागदपत्राची वाट पाहत आहेत. या कागदपत्राच्या आधारावर त्यांना प्रवास करता येणार आहे.
याच जहाजावर १२ इराणी क्रू सदस्यही होते. त्यांना वाचविण्यात यश आले असून नंतर त्यांना इराणला परत पाठविण्यात आले, अशी माहिती मुंबईतील शिपिंग महासंचालनालय (डीजी शिपिंग) कार्यालयातील सूत्रांनी द इंडियन एक्सप्रेसला दिली.
खासाब विमानतळावर अतिथी कक्षात थांबलेल्या आठ खलाशांपैकी एकाने द इंडियन एक्सप्रेसला नाव न उघड करण्याच्या अटीवर सांगितले की, जहाजावर क्षेपणास्त्र आदळल्यानंतर सर्व काही नष्ट झाले. आमच्यापैकी फक्त तिघांचे मोबाइल वाचू शकले आहेत. त्यांचे वैयक्तिक सामान, कागदपत्रे सर्व काही जळून खाक झाले आहे.
आम्ही सर्व काही गमावले
याच व्यक्तीने पुढे सांगितले, आम्ही सर्व काही गमावले आहे. रोख रक्कम, माझी सोन्याची साखळी, आयफोन, एचपी लॅपटॉप, सुमारे २-३ लाख रुपयांच्या इतर वस्तू.. इतरांच्या बाबतीतही असेच झाले आहे. आम्ही जेव्हा स्वतःला वाचविण्यासाठी समुद्रात उडी मारली, तेव्हा आमचे फोन हरवले. काहींना त्यांच्या घरातील सदस्यांचे फोन नंबरही पाठ नाहीत. त्यामुळे ते कुटुंबियांशी बोलण्यास इच्छुक आहेत.
१५ सेकंदात दोन क्षेपणास्त्र आदळले
हल्ल्यातून वाचलेल्या या खलाशाने सांगितले की, जहाजावरील नेव्हिगेशनचे काम पाहणाऱ्या खलाशाने सर्वात आधी क्षेपणास्त्र येत असल्याचे सांगितले. जहाजावर क्षेपणास्त्र आदळल्यानंतर जहाज एका बाजूला कलले. त्यानंतर काही सेकंदात दुसरे क्षेपणास्त्र आदळले, त्यानंतर जहाज पाण्यात बुडू लागले. अवघ्या १५ सेकंदात हे दोन हल्ले झाले.
