राजधानी दिल्ली सोमवारी (२५ सप्टेंबर) एका मोठ्या चोरीच्या घटनेने हादरली. दिल्लीतल्या जंगपुरा परिसरातील एका ज्वेलर्समध्ये तब्बल २५ कोटी रुपयांच्या दागिन्यांची चोरी झाली आहे. शोरूमच्या मालकाने पोलीस तक्रारीत सांगितलं की त्याच्या शोरूममधून तब्बल २० ते २५ कोटी रुपयांच्या सोने आणि हिरेजडीत दागिन्यांची चोरी झाली आहे. उमराव सिंह ज्वेलर्स असं या शोरूमचं नाव असून सोमवारी शोरूम बंद असताना चोरांनी शोरूमच्या भिंतीला भगदाड पाडून आत प्रवेश केला आणि आत ठेवलेले कोट्यवधी रुपयांचे दागिने पळवले.
चोरांनी नेमकी चोरी केली कशी? असा प्रश्न सर्वांना पडला होता. परंतु, आता या चोरीचं गूढ उकललं आहे. पोलीस तपासादरम्यान अनेक गोष्टींची उकल झाली आहे. पोलिसानी या चोरीच्या प्रकरणात आतापर्यंत तिघांना अटक केली आहे. यापैकी एकाचं नाव लोकेश असल्याचं पोलिसांनी सांगितलं. या चोरीसाठी लोकेशने दिल्लीतल्या चांदणी चौक बाजारातून हतोडी आणि इतर साधनसामग्री खरेदी केली होती. तसेच चोरी करण्याआधी अनेकदा दुकानाची रेकी (पाहणी) केली होती. त्यानंतर संपूर्ण योजना आखून त्याने दोन साथीदारांसह तब्बल २५ कोटी रुपयांच्या दागिन्यांची चोरी केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लोकेशने ९ आणि १७ सप्टेंबर रोजी शोरूमची रेकी करण्यासाठी शोरूममध्ये गेला होता. शोरूम ज्या इमारतीत आहे, त्या इमारतीचा अभ्यास केला आणि २४ सप्टेंबरच्या मध्यरात्री चोरी केली. रात्री ११ वाजता लोकेश त्याच्या साथीदारांसह शोरूमच्या इमारतीत गेला. शोरूमच्या बाजूला असलेल्या पायऱ्यांजवल त्याने त्याने भिंतीला भगदाड पाडून आत प्रवेश केला.
चोरी करण्यासाठी तो छिन्नी, हातोडी, स्क्रू ड्रायव्हर, करवत आणि इतर अवजारांसह जेवणही घेऊन गेला होता. त्याने मोठ्या प्रमाणात सुका मेवा बॅगेत ठेवला होता. त्याने ही चोरी करण्यासाठी चांदणी चौकातून १०० रुपयांची हातोडी, १३०० रुपयांचा डिश कटर आणि इतर अवजारं खरेदी केली होती. चोरीच्या दरम्यान २१ ते २५ सप्टेंबर हे चार दिवस तो चांदणी चौकातील विश्रामगृहात वास्तव्यास होता. चोरी केल्यानंतर त्याने दिल्लीतल्या काश्मिरी गेट बस डेपोवरून बस पकडली आणि मध्य प्रदेशमधल्या सागर येथे गेला. लोकेशने याआधी अशा अनेक चोऱ्या केल्या असल्याचं पोलीस तपासांत समोर आलं आहे.