साधारणपणे आपल्या घरात चोरी झाल्याचं समजल्यावर आपल्याला मुद्देमाल चोरीला गेल्यामुळे धक्का बसतो. पण मध्य प्रदेशच्या भिंड परिसरात एका घरमालकाला चक्क चोरीनंतर चोरानं त्याच्यासाठी सोडलेल्या चिठ्ठीमुळे जास्त मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे, हा घरमालक स्वत: पोलीस असून त्याच्याच घरात चोरानं डल्ला मारला आहे. पण त्यानं लिहिलेल्या चिठ्ठीमुळे घरमालकाला नक्की चोराचा राग करावा, त्याला दूषणं द्यावीत की त्याची कीव करावी, अशी शंका न आली तरच नवल! कारण त्या चोरानं मागे सोडलेल्या चिठ्ठीमध्ये असं काही लिहिलं होतं, की ते पाहून पोलीस तपास अधिकारी देखील अवाक् झाले!

नेमकं झालं काय?

ही घटना आहे मध्य प्रदेशच्या भिंड परिसरामधली. एनडीटीव्हीनं दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या महिन्यात बुधवार ३० जून रोजी या पोलीस अधिकाऱ्याचं कुटुंब बाहेरगावी गेलं होतं. सोमवारी ५ जुलै रोजी जेव्हा ते घरी परतले, तेव्हा त्यांना घरातलं सर्व सामान विखुरलेलं दिसलं. खोल्यांच्या कड्या-कोयंडे उचकटलेले होते. घरातून काही चांदीचे आणि सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचं दिसून आलं. घराबद्दल आणि कुटुंबियांबद्दल पूर्ण माहिती असणाऱ्या व्यक्तीनेच या चोरीसाठी मदत केल्याचा संशय देखील पोलिसांनी काढला. मात्र, घटनास्थळी सापडलेल्या एका चिठ्ठीमुळे पोलीस बुचकळ्यात पडले!

काय लिहिलं चोरानं चिठ्ठीत?

या घरात चोरी करणाऱ्या व्यक्तीनं घरमालकासाठी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. या चिठ्ठीमध्ये त्यानं आपली व्यथा सांगितली होती. “मला माफ करा. सॉरी मित्रा, माझा नाईलाज होता. जर मी ही चोरी केली नती, तर माझ्या मित्राने जीव गमावला असता. पण तुम्ही काळजी करू नका, माझ्याकडे पैसे येताच मी ते सगळे परत करीन”, असा संदेश या चिठ्ठीमध्ये लिहिण्यात आला होता, अशी माहिती भिंडचे पोलीस उपनिरीक्षक कमलेश कटारे यांनी दिली आहे.

“माफ करा, चूक झाली” सांगत चोरानं परत केल्या १७०० लसी

दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या कुटुंबाशी चांगला परिचय असणाऱ्या व्यक्तीचा या गुन्ह्यामध्ये सहभाग असू शकतो. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.