scorecardresearch

Bihar: बोगदा खोदून चोरलं रेल्वेचं आख्खं डिझेल इंजिन, चोरट्यांनी लढवलेली शक्कल पाहून पोलीसही अवाक

या प्रकरणात बरौनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तिघांना पोलिसांनी अटक केली आहे

Bihar: बोगदा खोदून चोरलं रेल्वेचं आख्खं डिझेल इंजिन, चोरट्यांनी लढवलेली शक्कल पाहून पोलीसही अवाक
(सांकेतिक छायाचित्र)

बिहारच्या बेगुसराय जिल्ह्यात चोरांनी चक्क बोगदा खोदून रेल्वेचं डिझेल इंजिन चोरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गरहारा रेल्वे यार्डात हा प्रकार घडला आहे. या यार्डात इंजिनाचे सुटे भाग दुरुस्तीसाठी ठेवण्यात आले होते. ते चोरट्यांनी लंपास केल्याची माहिती मुझफ्फरपूरमधील रेल्वे सुरक्षा दलाचे पोलीस निरीक्षक पी. एस. दुबे यांनी दिली आहे.

या प्रकरणात बरौनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. रेल्वे यार्डपर्यंत बोगदा खोदून त्या मार्गाने इंजिनाच्या लोकोमोटिव्ह भागासह इतर साहित्य लंपास केल्याची कबुली आरोपींनी चौकशीदरम्यान पोलिसांना दिली आहे. अटकेतील आरोपींनी भंगार गोदामाच्या मालकाचाही उल्लेख केला आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी मुझफ्फरपूर जिल्ह्यातील प्रभात नगरमधील भंगार गोदामात शोधमोहीम राबवली. या गोदामातून रेल्वे इंजिनाचे सुटे भाग असलेली १३ पोती पोलिसांनी जप्त केली आहेत.

पुणे- लोणावळा रेल्वे रुळावरील स्टंटबाजी पडली महागात…!; तरुणांना रेल्वे पोलिसांनी ठोकल्या बेड्या

जप्त केलेल्या साहित्यात इंजिनासह व्हिंटेज ट्रेनची चाकं आणि रेल्वेच्या अवजड लोखंडी भागांचा समावेश आहे. भंगार गोदाम मालकाचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. गेल्या वर्षी समस्तीपूर लोको डिझेल शेडच्या एका रेल्वे अभियंत्याला निलंबित करण्यात आले होते. पुर्णिया न्यायालय परिसरातील जुनं वाफेचं इंजिन विकल्याप्रकरणी अभियंत्यावर ही कारवाई करण्यात आली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-11-2022 at 09:20 IST

संबंधित बातम्या