पाकिस्तानमध्ये हिंदू मंदिरात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना समोर आली आहे. सिंध प्रांतात ही घटना घडली असून चोरट्यांनी तीन चांदीचे हार आणि रोख रक्कम लुटून नेली आहे. यांसदर्भात मंदिरातील पुजाऱ्याने तक्रार दिली आहे. हे चोरटे आजुबाजुच्या परिसरातील असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. तसेच तेथील हिंदू समुदाय दिवाळीची तयारी करत असताना मंदिरात चोरीची घटना घडल्याने सिंधमधील मंत्र्यांनी खबरदारी घेण्याचं आवाहन पोलिसांना केलंय.

मिळालेल्या माहितीनुसार, सिंधमधील कोत्री भागातील देवी माता मंदिरातून देवीच्या गळ्यात घातलेले तीन चांदीचे हार आणि दानपेटीतून २५ हजार रुपये चोरीला गेले आहेत. हे चोरटे जवळपासच्या परिसरातील असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. मात्र, दरोड्यादरम्यान चोरट्यांनी मंदिरातील देवतांची विटंबना केल्याचा दावा पोलिसांनी फेटाळून लावला आहे. सिंधमधील अल्पसंख्याक व्यवहार मंत्री ग्यानचंद इसरानी यांनी याप्रकरणी त्वरीत पोलीस कारवाईचे आवाहन केले आहे. त्यांनी अधिकाऱ्यांना मंदिरांभोवती सुरक्षा वाढवण्यास सांगितले. दरम्यान, विशेषत: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याने खबरदारी घेण्याचं आवाहन त्यांनी केलंय. यासंदर्भात इंडिया टूडेने वृत्त दिलंय.

या वर्षी ऑगस्टमध्ये, पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील एका हिंदू मंदिरावर जमावाने हल्ला केला होता. मंदिरात जाळपोळ करत मूर्तींचे नुकसान केले होते. धार्मिक अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्यात पाकिस्तान पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप करत भारताने या हल्ल्याचा निषेध केला होता आणि त्यांच्यावर सातत्याने होत असलेले हल्ले निंदनीय असल्याचे म्हटलं होतं.