गांधीनगर : ‘‘केवळ निवडणुका डोळय़ांसमोर ठेवून लोकप्रतिनिधींनी विचार मर्यादित ठेवू नयेत. त्यामुळे शहरांचे भले होऊ शकत नाही,’’ असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी व्यक्त केले. गुजरातमधील गांधीनगर येथे झालेल्या भाजपच्या महापौरांच्या अधिवेशनाला त्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित केले.

शहरांत इमारती कोसळण्याच्या आणि आग लागण्याच्या घटना चिंतेची बाब असल्याचे सांगून मोदी म्हणाले, की नियमांचे काटेकोर पालन केल्यास अशा दुर्घटनांना आळा बसू शकतो. ‘सब का साथ, सब का विकास, सब का विश्वास आणि सब का प्रयास’ हे भाजप शासनाचे प्रारुप इतरांपेक्षा वेगळे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. सरदार वल्लभभाई पटेल यांनी अहमदाबाद महापालिकेत केलेल्या कार्याचा उल्लेख करून मोदी म्हणाले, की आजही राज्यातील जनता त्यांच्या कार्याचे स्मरण मोठय़ा आदराने करते. तुम्ही तुमच्या शहरांचा विकास अशा स्तरांवर नेला पाहिजे, की आगामी पिढय़ांना तुमची आठवण येईल. अन् ते अभिमानाने म्हणतील, की आमच्या शहरात भाजपचा हा महापौर होता, त्याच्या काळात हे काम उभे राहिले.

शहरी विकास हे आव्हान नाही, तर संधी – देवेंद्र फडणवीस</strong>

भाजपच्या सुशासन विभागातर्फे गांधीनगर, गुजरात येथे आयोजित राष्ट्रीय महापौर संमेलनाच्या एका सत्रात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘महानगर प्रशासनात महापौरांची भूमिका’ या विषयावर मार्गदर्शन केले.

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महापौर या शब्दाची भेट स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी आपल्याला दिली. महापालिका प्रशासनात महापौर आणि नगरसेवक हे अतिशय महत्त्वाचे घटक असतात. नरेंद्र मोदी यांनी सुशासनाचा रचलेला पाया, नव्याने नगरविकासाच्या तयार झालेल्या योजना, शहरी विकास हे आव्हान नाही, तर त्याकडे संधी म्हणून बघण्याची गरज आहे. विकासात शहराच्या विकास आराखडय़ाची भूमिका, संसाधनांचा सुयोग्य वापर, हरित ऊर्जा, राजकीय इच्छाशक्ती, नावीन्यपूर्ण प्रयोग, शहरवासीयांशी सातत्याने संवाद अशा अनेक विषयांवर देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधला आणि विविध प्रश्नांना उत्तरेसुद्धा दिली.

देशभरातील सुमारे १८ राज्यांतील १२५ हून अधिक महापौर या राष्ट्रीय महापौर संमेलनात सहभागी झाले होते.

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी, गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील, डॉ. विनय सहस्रबुद्धे, विजया रहाटकर आदी नेते यावेळी उपस्थित होते.