बांगलादेशात सोमवारी रात्री आणखी एका हिंदू धर्मीय नागरिकाची हत्या करण्यात आली. नरसिंगदी शहरातील चारसिंधधूर बाजार भागात रात्री ११ च्या सुमारास ही घटना घडली. मोनी चक्रवर्ती (वय ४०) असे मृताचे नाव असून त्याचे किराणा दुकान होते.
मोनी गेली अनेक वर्षे किराणा दुकान चालवत होते. रात्री दुकान बंद करून घरी परतत असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला आणि तिथून पळ काढला. स्थानिकांनी मोनी यांना जखमी अवस्थेत पलाश उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत म्हणून घोषित केले. या प्रकरणी पलाश पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बांगलादेशात हिंदू नागरिकाच्या हत्येची आठवड्याभरातील ही तिसरी घटना आहे. सोमवारी सकाळी जेस्सोर जिल्ह्यात राणा प्रताप बैरागी आणि शनिवारी खोकोन चंद्र दास (वय ५०) यांची गळफास देऊन निर्घृण हत्या करण्यात आली.
हत्येच्या निषेधार्थ मानवी साखळी आंदोलन
किराणा दुकानदार मोनी चक्रवर्ती याच्या हत्येच्या निषेधार्थ नरसिंगदी जिल्ह्यातील शेकडो व्यवसायकिांनी मंगळवारी मानवी साखळी आंदोलन केले. हल्लेखोरांचा तातडीने शोध घेऊन त्यांना कडक शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. २४ तासांत जर हल्लेखोरांना अटक करण्यात आली नाही, तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा स्थानिक व्यवसायिक संघटनेने दिला आहे. मोनी याचे कोणाशीच वैर नव्हते, असे सांगतानाच त्यांच्या निकटवर्तीयांनी ही हत्या धार्मिक वादातून झाल्याचा अंदाजही फेटाळून लावला.
हादी हत्येप्रकरणी १७ जणांविरोधात गुन्हा
बांगलादेशातील विद्यार्थी चळवळीतील नेता शरीफ उस्मान हादी यांची हत्या राजकीय सुडातून झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या प्रकरणी १७ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी १२ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात अवामी लीग आणि छात्र लीगच्या नेत्यांचा समावेश आहे.
जमात-ए-इस्लामीकडून निवडणुकीला विरोध
जमात-ए-इस्लामी या सर्वात मोठ्या पक्षाने बांगलादेशात निवडणुकीसाठी योग्य वातावरण नसून हंगामी सरकारमधील काही गट निवडक पक्षांना अधिक कल देत असल्याचा दावा केला. पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या सोमवारी झालेल्या बैठकीत १२ फेब्रुवारीला होणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली. त्या वेळी हे मत व्यक्त करण्यात आले. यापूर्वी २००१ ते २००६ दरम्यान खालिदा झिया यांची ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी’ सत्तेत असताना जमात-ए-इस्लामीने त्यांच्याशी आघाडी केली होती. आगामी निवडणुकीत हे दोन्ही पक्ष आता सत्तेचे प्रमुख दावेदार आहेत.
