नवी दिल्ली : महापौर निवडीसाठी सोमवारी दिल्ली महानगरपालिकेच्या (एमसीडी) सभागृहाची सभा बोलावण्यात आली आहे. यापूर्वी महापौर निवडीसाठीचे दोन प्रयत्न फसले आहेत. ‘दिल्ली म्युनिसिपल कॉर्पोरेशन’ (डीएमसी) कायद्यातील तरतुदीनुसार (१९५७) महापौर व उपमहापौरांची निवडणूक महापालिकेच्या पहिल्या सभेतच व्हायला हवी. दिल्ली महापालिका निवडणुकीला दोन महिने उलटले तरी अद्याप शहराला नवा महापौर मिळालेला नाही.
यापूर्वी, दिल्ली महापालिका सभागृहाची सभा ६ आणि २४ जानेवारीला दोनदा आयोजित केली होती. परंतु भाजप आणि आम आदमी पक्षाच्या नगरसेवकांनी केलेल्या गदारोळामुळे पीठासीन अधिकाऱ्यांनी महापौर निवडणूक न घेताच कामकाज तहकूब केले. गेल्या वर्षी ४ डिसेंबर रोजी झालेल्या निवडणुकीनंतर २५० सदस्यीय महापालिका सभागृहाचे पहिले सत्र कामकाजाविना पूर्ण वाया गेले. दुसऱ्या सत्रात नामनिर्देशित सदस्यांनी शपथ घेतल्यावर निवडून आलेल्या नगरसेवकांनी शपथ घेतली होती. शपथविधीचे कामकाज पूर्ण झाल्यानंतर पीठासीन अधिकारी व भाजपचे नगरसेवक सत्य शर्मा यांनी सभागृहाचे दुसरे अधिवेशन पुढील तारखेसाठी तहकूब केले होते. भाजपच्या सदस्यांनी सभागृहाबाहेर ‘आप विरोधात घोषणा दिल्या होत्या. ‘आप’च्या सदस्यांनी सभागृहात पाच तास निदर्शने केली होती.
दिल्ली महापालिका निवडणुकीत, ‘आप’ १३४ नगरसेवकांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला, तर भाजपने १०४ जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसला नऊ जागा मिळाल्या आहेत. महापौरपदासाठी भाजपकडून रेखा गुप्ता व ‘आप’च्या शेली ओबेरॉय शर्यतीत आहेत. उपमहापौरपदासाठी ‘आप’ने आले मोहम्मद इक्बाल आणि भाजप कमल बागरी यांना उमेदवारी दिली आहे.