माणुसकी… ‘या’ ८१ वर्षीय शीख व्यक्तीने महाराष्ट्रात येणाऱ्या-जाणाऱ्या २० लाख लोकांना दिलं जेवण

येणाऱ्या जाणाऱ्यांची सोय व्हावी म्हणून २४ तास सुरु असत किचनमधील काम

(Photo: Twitter/Harjinder Singh Kukreja)

मार्च महिन्यामध्ये २५ तारखेला लॉकडाउनची घोषणा झाल्यापासून अनेक स्थलांतरित मजुरांनी पायीच आपल्या राज्यात परत जाण्यास सुरुवात केली आहे. मुंबईसहीत महाराष्ट्रातील अनेक भागांमधील लाखो मजूर पायीच आपल्या गावाकडे रवाना झाले. आपल्या गावी पायी चालत निघालेल्या अशा मजुरांना अन्न देण्याचं काम यवतमाळ जिल्ह्यातील करंजी या गावात दोन महिन्यांपासून एक वयस्कर शीख इसम करत आहे. ८१ वर्षांच्या या व्यक्तीने मागील दोन महिन्यांमध्ये या मार्गावरुन पायी चालत निघालेल्या २० लाख मजुरांना खाऊ घातलं आहे. यासंदर्भातील वृत्त आयएएनएस या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

बाबा कर्नाल सिंग खैरा असं या व्यक्तीचं नाव आहे. यवतमाळ जिल्ह्यातील करंजी हे गाव  नागपूर -हैद्राबाद राष्ट्रीय महामार्ग क्र ७ वर पांढरकवडा नजीक आहे. बाबा कर्नाल यांची एकमेव छोटेखानी टपरी वजा खानावळ आहे. पत्र्याची शेड आणि प्लास्टिकच्या ताडपत्रीपासून बनवण्यात आलेल्या या शेडमध्येच बाबा कर्नाल सिंग राहतात. “हा दुर्गम आणि आदिवासी भाग आहे. येथून १५० किमी मागच्या बाजूला आणि पुढे ३०० किमीपर्यंत एकही ढाबा किंवा हॉटेल नाही. त्यामुळेच अनेकजण आमच्या गुरु का लंगरमध्ये थांबतात आणि २४ तास सुरु असणाऱ्या अन्न सेवेचा लाभ घेतात,” असं बाबा कर्नाल यांनी आयएएनएसशी बोलताना सांगितलं.

मागील अनेक वर्षांपासून ही सेवा सुरु असली तरी लॉकडाउन सुरु झाल्यापासून येथे येणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामध्ये स्थलांतरित मजुरांबरोबरच ट्रक चालक आणि गावकऱ्यांचाही समावेश आहे. “रोज शेकडोच्या संख्येने लोकं या अन्नसेवेचा लाभ घेण्यासाठी येतात आणि त्यामुळे आमच्या स्वयंपाकघरामध्ये जेवण बनवणं सतत सुरुच असतं. जात, धर्म, पंथ असा कोणताही भेदभाव न करता आम्ही सर्वांचे हसतमुखाने स्वागत करतो. मी १७ सेवकांची एक टीम आहे. त्यामुळे ११ स्वयंपाकी आहेत. हे लोकं शिफ्टमध्ये काम करतात. त्यामुळे आमचे किचन कधीच बंद नसतं. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही किचनमधील काम २४ तास सुरु ठेवतो,” असं बाबा कर्नाल सांगतात.

बाबा कर्नाल हे स्वत: येथे काम करत असले तरी सर्व आर्थिक मदत त्यांना त्यांचा भाऊ म्हणजेच बाबा गुरुबक्श सिंग खैरा करतात. गुरुबक्श हे अमेरिकेमध्ये स्थायिक आहेत. गुरुबक्श हे स्वत:च्या खिशातील निधी देण्याबरोबर अमेरिकेमधील शीख समुदायाकडून या अन्नदानासाठी पैसा उभा करतात.

मागील १० आठवड्यांमध्ये म्हणजेच दोन महिन्यांमध्ये या लंगरमधून १५ लाख जणांना मोफत जेवण देण्यात आलं आहे. तर पाच लाख खाण्याची पाकिटं येथून जाणारे स्थलांतरित मजुर घेऊन गेले आहेत. या लंगरमध्ये सकाळी चहा आणि बिस्कीट किंवा पोळी दिली जाते. त्यानंतर दुपारच्या जेवणाला साधा भात आणि तुरडाळ असे जेवण असते. अन्नाबरोबरच या ठिकाणी येणाऱ्यांना अंघोळीसाठी साबण आणि बोअरवेलचे पाणीही दिलं जातं.

हा लंगर वाई येथील ऐतिहासिक गुरुद्वारा असणाऱ्या भगोद साहिबपासून ११ किमी अंतरावर आहे. या ठिकाणी शिखांचे दहावे धर्मगुरु गुरु गोबिंदसिंग नंदेडला जाताना १७०५ मध्ये विश्रांतीसाठी थांबले होते असं सांगितलं जातं. नांदेडपासून जवळपास २५० किमी अंतरावर असताना ७ ऑक्टोबर १७०८ रोजी त्यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर जवळपास १२५ वर्षांनंतर ही जागा जगप्रसिद्ध ‘गुरुद्वारा तख्त हजुरी साहिब सचखंड’ नावाने ओळखली जाऊ लागली. सध्या ही जागा शीख धर्मातील पाच तख्यांपैकी एक आहे.

“गुरुद्वारा भगोद साहिब मुख्य रस्त्यापासून दूर असल्याने, १९९८ मध्ये (२२ वर्षापूर्वी) येथे हा नि: शुल्क ‘लंगर’ त्याची शाखा सुरु करण्यात आली. मला नांदेड गुरुद्वारा साहिबच्या बाबा नरिंदर सिंहजी आणि बाबा बलविंदरसिंगजी यांच्या आशीर्वादाने व मार्गदर्शनाने हे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली,” असं बाबा कर्नाल सांगतात. माणसांबरोबर आजूबाजूच्या परिसरातील अडीचशेहून अधिक प्राण्यांना लंगरमधून गूळ आणि पोळी खायला दिली जाते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: This 81 year old sikh man has fed over 20 lakh people on remote maharashtra highway scsg

Next Story
अनलजित सिंग
ताज्या बातम्या