माणूस असो की माकड दारुचं व्यसन वाईटच… माकडाला झाली ‘जन्मठेपे’ची शिक्षा

या माकडाने २५० जणांना केली मारहाण

प्रतिनिधिक फोटो

तुम्ही कधी माकडाला जन्मठेपेची शिक्षा झाल्याचं ऐकलं आहे का? नसेलच. कारण तुम्हाल की माकडाला कोण कशाला आणि ती ही थेट जन्मठेपेची शिक्षा करेल. मात्र कानपूरमधील प्राणीसंग्रहायलामध्ये एका माकडाला त्याचे उर्वरित आयुष्य पिंजऱ्यामध्येच घालवावे लागणार आहे. या माकडाने अनेकांना त्रास दिल्याने त्याला कायमचं कोंडण्यात आलं आहे. या संदर्भातील वृत्त एआयएनएसने दिलं आहे.

पिंजऱ्यामध्ये कोंडण्यात आलेल्या या माकडाचे नाव कलुआ असं आहे. या माकडाने मिर्जापूरमधील अडीचशेहून अधिक व्यक्तींवर हल्ला केल्याचे सांगण्यात येते. धक्कादायक बाब म्हणजे या माकडाने केलेल्या हल्ल्यामध्ये एकाचा मृत्यू झाल्याचेही सांगण्यात येत आहे. येथील एका जादूगाराने कलुआला पाळलं होतं. या जादूगाराला दारुचे व्यसन असल्याने तो माकडालाही दारु पाजायचा. या माकडालाही दारुचे व्यसन लागले. मात्र मध्यंतरी या माकडाचा मालक म्हणजेच दारुडा जादूगार मरण पावला. दारु मिळणं बंद झाल्याने माकड हिंसक झाले. त्यातून त्याने स्थानिकांवर हल्ला करण्यास सुरुवात केली. या माकडाने उच्छाद मांडल्यानंतर स्थानिक प्रशासनातील अधिकाऱ्यांनी वन अधिकारी आणि प्राणीसंग्रहालयाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने या माकडाला पकडले. अनेक प्रयत्नानंतर या माकडाला पकडण्यात यंत्रणांना यश आलं.

“आम्ही या माकडाला काही महिने एकटं ठेवलं होतं. आता त्याला एका स्वतंत्र पिंजऱ्यामध्ये हलवण्यात आलं आहे. मात्र एवढ्या महिन्यानंतरही त्याच्या वागणूकीमध्ये काहीही फरक पडलेला नाही. आधीप्रमाणेच तो हिंसकपणे वागत असल्याचे दिसून येत आहे. मागील तीन वर्षांपासून हे माकड आमच्याकडे आहे मात्र त्याच्यामध्ये जराही फरक पडलेला नाही. एवढ्या वर्षानंतरही त्याच्यामध्ये काहीच फरक न पडल्यामुळे आम्ही त्याला कायमचं पिंजऱ्यामध्येच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे,” असं प्राणी संग्रहालयाचे प्रमुख नासीर यांनी सांगितलं.

हे माकड सहा वर्षांचे असून डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार या माकडाला मोकळं सोडलं तर तो पुन्हा नागरिकांवर हल्ला करु शकतो. हे माकड कोणाशीही मिळून मिसळून वागत नाही असं येथील कर्मचारी सांगतात.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: This alcoholic monkey in uttar pradesh will serve life term in captivity scsg

ताज्या बातम्या