तुमचं मत तुम्हाला मजबूत करणारं शस्त्र हे विसरू नका-प्रियंका गांधी

योग्य प्रश्न विचारण्यास शिका असं आवाहन प्रियंका गांधी यांनी केलं आहे

पक्षाचे सरचिटणीस पद मिळाल्यापासून प्रियंका गांधी या काँग्रेसमध्ये चांगल्याच सक्रिय झाल्या आहेत.
तुमचं मत तुम्हाला मजबूत करणारं शस्त्र आहे हे विसरू नका आणि त्या भावनेतून मतदान करा असं आवाहन काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी मतदारांना केलं आहे. येणाऱ्या दिवसात योग्य प्रश्न विचारा, हा तुमचा देश आहे तुम्ही या देशाला घडवलं आहे असं प्रियंका गांधी म्हटलं आहे. हा देश तुमचा आहे, शेतकऱ्यांचा आहे, महिलांचा आहे, रोज मेहनत करणाऱ्या मजूर वर्गाचा आहे. ज्यांनी हा देश घडवला त्या प्रत्येकाने योग्य प्रश्न विचारणं आवश्यक आहे असंही प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे.

गुजरातच्या गांधीनगरमध्ये झालेल्या सभेत त्यांनी मोदी सरकारवरही टीका केली आहे. पंधरा लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यात जमा होणार होते त्याचं काय झालं? असा प्रश्न प्रियंका गांधी यांनी विचारला. इतकंच नाही तर देशात सध्या जे काही सुरु आहे ते चांगलं नाही. हे वातावरण आपल्या देशासाठी योग्य नाही असंही प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे. देशात स्त्रिया सुरक्षित नाहीत. देशात रोजगाराच्या संधी नाहीत. त्यामुळे देश अपेक्षेने बदलाकडे पहातो आहे. ज्यांनी तुम्हाला आश्वासनं दिली त्यांना प्रश्न विचारण्यास शिका असंही आवाहन प्रियंका गांधी यांनी केलं आहे.

गांधीनगर या ठिकाणी झालेल्या काँग्रेसच्या रॅलीत प्रियंका गांधी यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली. आपल्या संयमी संयत भाषणात त्यांनी विचार करून मतदान करा असं आवाहन जनतेला केलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: This country is made on the foundations of love harmony brotherhood say priyanka gandhi