कर्नाटकातल्या बंगळुरु या ठिकाणी चंदापुरा भागात असलेल्या स्टेट बँकेतल्या शाखेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एसबीआयची ब्रांच मॅनेजर आणि एक ग्राहक यांच्यात भाषेवरुन वाद झाला आहे. कर्नाटकात हिंदी विरुद्ध कानडी या वादाला जुने संदर्भ आहेत. मात्र या व्हिडिओने वाद नव्याने उफाळून आला आहे. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतो आहे.

नेमकं काय घडलं?

जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे त्यानुसार बँकेत आलेला ग्राहक म्हणतो, मॅडम माझ्याशी कानडीत बोला. हे कर्नाटक आहे. त्यावर ती महिला म्हणते हा भारत आहे, मी कानडीत बोलणार नाही तर मी हिंदीत बोलणार. त्यानंतर या दोघांमध्ये वाद वाढतो आणि मग ती महिला कर्मचारी म्हणते आता तर मी हिंदीतच बोलणार कानडीत बोलणारच नाही. त्यावर तो ग्राहक म्हणतो सुपर मॅडम सुपर. हा वाद काही मिनिटं चालला आहे. या प्रसंगाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण, आरबीआय यांना टॅग करुन याबाबत लोक प्रश्न विचारत आहेत.

ग्राहकाने सोशल मीडियावर पोस्ट केला व्हिडीओ

या सगळ्यानंतर ग्राहकाने हा व्हिडीओ त्याच्या एक्स पोस्टवर पोस्ट केला आहे. चंदापुरा येथील एसबीआय बँक आहे. तिथे काय चाललं आहे बघा. आपल्याला सगळ्यांना मिळून यांना धडा शिकवावा लागेल. या आशयाची पोस्ट या ग्राहकाने केली आहे.

भाषिक अस्मितेचा विषय पुन्हा उफाळून आला आहे

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भाषेच्या अस्मितेचा मुद्दा कर्नाटकात पुन्हा उफाळून आला आहे. कर्नाटक रक्षणा वेदिके या संघटनेने या घटनेचा निषेध नोंदवत २१ मे २०२५ म्हणजेच आज एसबीआयच्या बंगळुरु येथील मुख्य शाखेवर निषेध मोर्चा काढला. बँकांमध्ये स्थानिक भाषेत व्यवहार झाला पाहिजे ही मागणी अनेक वर्षांपासून होते आहे. या वादाने पुन्हा एकदा ती मागणी अधोरेखित झाली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचंही उत्तर

RBI च्या निर्देशांनुसार हे स्पष्ट आहे की बँकांना स्थानिक भाषेतच त्यांचे व्यवहार करायचे आहेत. या घटनेनंतर आणि व्हायरल व्हिडीओनंतर विविध प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत. काही युजर्सनी बँकेच्या कर्मचाऱ्याने कर्नाटकच्या संस्कृतीचा अपमान केल्याची प्रतिक्रिया दिली आहे.दरम्यान कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यापर्यंतही हा व्हिडीओ पोहचला आहे. त्यांनी सदरचा व्हिडीओ पाहून अत्यंत निंदनीय बाब या आशयाची पोस्ट केली आहे. अशा घटना सहन केल्या जाणार नाहीत असंही त्यांनी म्हटलं आहे. आता या व्हायरल व्हिडीओनंतर नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.