गेल्या काही दिवसांपासून एआय या नव्या तंत्रज्ञानाची प्रचंड चर्चा आहे. या नव्या तंत्रज्ञानामुळे अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या असल्याचंही म्हटलं जातंय. क्रिएटीव्ह क्षेत्रात काम करणाऱ्यांना या एआयचं सर्वात मोठं आव्हान असणार आहे. त्यामुळे एआयच्या उदयामुळे बेरोजगारी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. परंतु, एआयमुळे नोकऱ्या जाणार नसून नोकऱ्यांमध्ये वाढ होईल, असा विश्वास आयबीएम इंडिया आणि दक्षिण आशियाचे संचालक संदीप पटेल यांनी व्यक्त केलाय. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

आयएएनएस या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना त्यांनी तंत्रज्ञानात झालेली प्रगती आणि त्यावर आधारी नवकल्पनांबाबत त्यांची निरिक्षणे शेअर केली. “एआयमुळे नोकरींच्या संधीमध्ये वाढ होणार आहे. जेव्हा नव्या नोकरीची भूमिका असते तेव्हा सर्व भीती व्यक्त करतात”, असं संदीप पटेल म्हणाले. यावेळी त्यांनी इंटरनेट क्रांतीचाही उल्लेख केला. “इंटरनेटमुळे वृत्तपत्र छपाईसारख्या अनेक विशिष्ट क्षेत्रातील नोकऱ्या कमी झाल्या. परंतु, वेब डिझाईन, डेटा सायन्स, डिजिटल मार्केटिंग आणि वेब प्रकाशनसारख्या नवीन नोकऱ्या उदयास आल्या. या नव्या नोकऱ्यांमुळे आता लाखो लोकांना रोजगार मिळाला आहे”, असंही संदीप पटेल म्हणाले.

हेही वाचा >> “घोडेबाजाराचं प्रकरण गंभीर, बॅलेट पेपर सादर करा”, चंदीगड महापौर निवडणुकीवर सर्वोच्च न्यायालयाचे पुन्हा ताशेरे

रिस्किलिंग काळाची गरज

पटेल यांनी रिस्किलींगचा मुद्दा अधोरेखित केला. “सध्या ४६ टक्के भारतीय कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना ऑटोमेशन आणि एआय टुल्सससह सहयोग करण्यासाठी सक्रियपणे प्रशिक्षण देत आहेत किंवा त्यांना पुन्हा कौशल्य शिकवत आहेत. जे या दिशेने पुढील प्रयत्नांसाठी महत्त्वपूर्ण वाव दर्शवितात.”

“या परिस्थितीची सरकारला चांगली जाणीव असल्याचंही ते म्हणाले. ते म्हणाले की, अनेक संस्थांमध्ये अनेक कर्मचारी नवं एआय आणि ऑटोमेशन टुल्ससह काम करण्यास उत्सुक आहेत. सध्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्याचं सर्वांत मोठं आव्हान आहे. प्रत्येकजण कोडर किंवा एआय डेव्हलपर असू शकत नाही. परंतु, या विकसित होत असलेल्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेणे गरजेचं आहे”, असंही ते म्हणाले.