केंद्रीय गृहमंत्रालयाने या वर्षात देशभरात झालेल्या जातीय दंगलींची आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीवरून गेल्या काही वर्षांत झालेल्या दंगलींच्या तुलनेत या वर्षी कमी हिंसाचाराच्या घटना घडल्या असल्याचे या आकडेवारीवरुन दिसते. मात्र, यंदाच्या वर्षात उत्तर प्रदेशात सर्वाधिक जातीय दंगली झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

या आकडेवारीनुसार, या वर्षी देशभरात आत्तापर्यंत २९६ जातीय दंगलींच्या घटना समोर आल्या आहेत. या घटनांमध्ये ४४ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर ८९२ लोक जखमी झाले आहेत. मात्र, गेल्या दोन वर्षांत अशा दंगलींमध्ये विक्रमी लोकांचा मृत्यू झाला आहे. २०१६ मध्ये ७०३ तर २०१५ मध्ये ७५१ हिंसक घटना घडल्या आहेत. यांमध्ये अनक्रमे ८६ आणि ९७ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यातुलनेत गेल्या सहा महिन्यांत उत्तर प्रदेशात सर्वाधिक ६० हिंसक घटना घडल्या आहेत. यानंतर कर्नाटक, मध्यप्रदेश, राजस्थान आणि पश्चिम बंगाल या राज्यांचा क्रमांक लागतो. दरम्यान, उत्तर प्रदेशात झालेल्या ६० घटनांमध्ये १६ लोकांचा जीव गेला आहे. तर १५१ लोक जखमी झाले आहेत. तर कर्नाटकातील ३० घटनांमध्ये तीन लोकांचा मृत्यू झाला तर ९३ लोक जखमी झाले आहेत. दुसरीकडे नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगालमधीर बशीरघाट येथे २६ जातीय दंगली झाल्या. यामध्ये तीन लोकांना आपला जीव गमवावा लागला. गेल्या वर्षी याच राज्यात ३२ हिंसक घटना घडल्या यांमध्ये ४ लोकांचा जीव गेला होता.

या महत्वपूर्ण अहवालानुसार, जातीय दंगलींच्या घटनांमध्ये उत्तर प्रदेश आणि कर्नाटक ही राज्ये सलग दोन वर्षे सर्वांत वरच्या क्रमांकावर आहेत. गेल्या वर्षी १६२ आणि कर्नाटकमध्ये १०१ घटनांची नोंद झाली. तर, २०१५ मध्ये जातीय दंगलींच्या घटनांचा आकडा उत्तरप्रदेशात १५५, तर कर्नाटकमध्ये १०५ होता. २०१५ मध्ये महाराष्ट्रातही १०५ घटना समोर आल्या होत्या. तर २०१४ मध्ये ‘टॉप तीन’ मध्ये उत्तर प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांचा समावेश होता.

केंद्र सरकारने याबाबत लोकसभेत दिलेल्या लेखी उत्तरानुसार या वर्षी मे महिन्यांपर्यंत जातीय दंगलींच्या घटनांमध्ये मध्य प्रदेशमध्ये २९, राजस्थानमध्ये २७, पश्चिम बंगालमध्ये २६ आणि बिहारमध्ये २३ घटना घडल्या आहेत. याशिवाय गुजरात आणि महाराष्ट्रात प्रत्येकी २० घटनांची नोंद झाली आहे. २०१४ ते मे २०१७ मधील घटनांची आकडेवारी पाहिल्यास देशात जातीय दंगलींची संख्या २ हजार ३९४ इतकी भयंकर आहे. यामध्ये एकूण ३२२ लोक मारले गेले होते. तर १५ हजार ४९८ लोक जखमी झाले होते. या मृत्यूंच्या संख्येनुसार, २०१५ वर्ष हे सगळ्यात भयंकर होते. या वर्षी एकूण ९७ लोक मारले गेले होते.