पीटीआय, सोमनाथ (गुजरात)

स्वातंत्र्यानंतर सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीला ज्या शक्तींनी विरोध केला होता, त्या आजही आपल्यामध्ये सक्रिय आहेत आणि त्यांना पराभूत करण्यासाठी देशाने सतर्क, एकजूट राहण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. तलवारीऐवजी अन्य पद्धतीने भारताविरोधात कट रचला जात आहे. फूट पाडण्याचा कट रचणाऱ्या शक्तींना पराभूत करण्यासाठी अधिक शक्तिशाली व्हावे लागेल, असे पंतप्रधानांनी नमूद केले.

‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’निमित्त सभेचे आयोजन करण्यात आले होते. गुजरातच्या गिर सोमनाथ जिल्ह्यात असलेल्या या ऐतिहासिक मंदिरावर पूर्वी झालेल्या हल्ल्यांचा आणि प्रत्येक वेळी ते कसे पुन्हा बांधले गेले, याचा संदर्भ देत तलवारीच्या जोरावर लोकांची मने कधीही जिंकता येत नाहीत, असे पंतप्रधान म्हणाले. सोमनाथचा हजार वर्षांचा इतिहास हा विनाश आणि पराभवाचा नाही, तर विजय आणि पुनर्बांधणीचा आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले.(कोट)

सोमनाथचा इतिहास आपल्या पूर्वजांच्या शौर्याचे स्मरण आहे. ते त्यांच्या त्याग आणि समर्पणाचे प्रतीक आहे. परकीय आक्रमकांनी अनेक शतके भारताचा नाश करण्याचा प्रयत्न केला, परंतु सोमनाथ किंवा देश झुकला नाही.- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

‘सरदार पटेल यांच्या मार्गात अडथळे’

स्वातंत्र्यानंतर, जेव्हा सरदार वल्लभभाई पटेल यांनी सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीची प्रतिज्ञा घेतली तेव्हा त्यांच्या मार्गात अडथळे आणण्यात आले आणि १९५१ मध्ये जेव्हा भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद येथे पुनर्निर्मित मंदिराचे उद्घाटन करण्यासाठी आले तेव्हाही आक्षेप घेण्यात आला, असा दाखलादेखील पंतप्रधानांनी दिला.

इतिहास लपविण्याचा प्रयत्नवीर हमिरजी गोहिल आणि वेगाडाजी भिल यांच्यासारख्या अनेक शूरवीरांनी सोमनाथ मंदिराचे आक्रमणकर्त्यांपासून रक्षण करण्यासाठी आपले प्राण अर्पण केले. पण दुर्दैवाने, त्यांना त्यांचे श्रेय आणि महत्त्व देण्यात आले नाही. काही इतिहासकार आणि राजकारण्यांनी या आक्रमणांचा इतिहास लपवण्याचाही प्रयत्न केला, असे पंतप्रधान म्हणाले.

– सोमनाथवरील हल्ले द्वेषामुळे प्रेरित होते, परंतु ते केवळ लूटपाट असल्याचे दर्शवण्यात आले. धार्मिक उद्देश लपविण्यासाठी ते केवळ लूट म्हणून दाखवणारी पुस्तके लिहिली गेली.

– सोमनाथ मंदिर वारंवार उद्ध्वस्त करण्यात आले. जर हे हल्ले केवळ लुटण्यासाठीच झाले असते तर हजार वर्षांपूर्वीच्या पहिल्या मोठ्या लुटीनंतर ते थांबले असते. पण सोमनाथच्या पवित्र देवतेची विटंबना करण्यात आली.

– मंदिर उद्ध्वस्त करून आपण जिंकलो असे आक्रमकांना वाटले होते, परंतु हजार वर्षांनंतरही सोमनाथचा ध्वज अभिमानाने फडकत आहे.

– स्वत:च्या धर्माबाबत निष्ठा असलेला कोणीही अतिरेकी विचारसरणीचे समर्थन करणार नाही, तथापि, तुष्टीकरणात गुंतलेले लोक अशा धार्मिक अतिरेक्यांना बळी पडतात, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केले.

‘शौर्य यात्रे’त सहभाग

सोमनाथ मंदिरात रविवारी झालेल्या ‘शौर्य यात्रे’त डमरू वाजवणाऱ्या लोकांचा एक गट आणि गुजरातच्या विविध भागांतून आणलेले १०८ अश्व यांचा समावेश होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका खुल्या वाहनातून मिरवणुकीचे निरीक्षण केले. मिरवणुकीची सुरुवात शंख सर्कलपासून झाली आणि पंतप्रधानांनी सोमनाथ मंदिर संकुलाच्या समोर असलेल्या वीर हमिरजी गोहिल सर्कलपर्यंत सुमारे एक किलोमीटर प्रवास केला. मिरवणुकीदरम्यान पंतप्रधानांनी एका पुजाऱ्याकडून दोन डमरू घेऊन वाजविले. या वेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूला जमलेल्या गर्दीने जल्लोष केला आणि अनेकांनी फुलांचा वर्षाव केला, तर कलाकारांनी मार्गावर नियमित अंतराने उभारलेल्या विविध व्यासपीठांवर भारताचे विविध नृत्यप्रकार सादर केले.