तामिळनाडूचे उच्च शिक्षण मंत्री पोनमुडी यांनी हिंदी भाषेबाबत वादग्रस्त विधान केले आहे. “हिंदी भाषेपेक्षा इंग्रजी भाषा अधिक मौल्यवान आहे, जे हिंदी बोलतात ते क्षुल्लक नोकऱ्यांमध्ये गुंतलेले आहेत”. एवढचं नाही तर हिंदी बोलणारे आमच्याकडे पाणीपुरी विकत असल्याचा वक्तव्य पोनमुडी यांनी केल आहे.

हिंदी ही ऐच्छिक असावी मात्र, अनिवार्य नसावी.
कोईम्बतूर येथील भारथिअर विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात पोनमुडी बोलत होते. “इंग्रजी ही भाषा म्हणून हिंदीपेक्षा अधिक मौल्यवान आहे. त्यामुळे हिंदी ही ऐच्छिक असावी मात्र, अनिवार्य नसावी”. कोईम्बतूरच्या भरथियार विद्यापीठातील विद्यार्थ्यांना पोनमुडी यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मधील फायदेशीर पैलूंची अंमलबजावणी करणार असल्याचे आश्वासन दिले. मात्र, राज्यात केवळ दोन-भाषा प्रणाली लागू करण्याचा राज्य सरकारचा संकल्प असल्याचेही पोनमुडी म्हणाले.

तामिळनाडू भारतातील शिक्षण व्यवस्थेत आघाडीवर
तमिळनाडूचे राज्यपाल आर.एन. रवी यांच्यासोबत दीक्षांत समारंभात मंचावर चर्चा करताना, इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय भाषा आधीच शिकवली जात असताना हिंदी का शिकावी, असा प्रश्न पोनमुडी यांनी केला. “तामिळनाडू भारतातील शिक्षण व्यवस्थेत आघाडीवर आहे” आणि तमिळ विद्यार्थी कोणतीही भाषा शिकण्यास तयार असल्याचा दावा पोनमुडी यांनी केला आहे. मात्र, “हिंदी ही केवळ पर्यायी भाषा असली पाहिजे, सक्तीची नाही”, असेही ते म्हणाले.