भारतासह जगभरातील अनेक देशांची सरकारे राष्ट्रीय सुरक्षेशी काहीही संबंध नसतानाही हेरगिरीच्या साधनांचा कसा वापर करू शकतात, हे ‘द वायर’ या वेबाईटसह आणि अन्य १६ माध्यम संस्थांनी केलेल्या संयुक्त आंतरराष्ट्रीय शोधपत्रकारितेतून समोर आले आहे. हॅकिंगद्वारे भारतातील मंत्री, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी त्यांचे फोन हॅक करण्यात आले असण्याची शक्यता या माध्यम संस्थांच्या ‘प्रोजेक्ट पेगॅसस’मध्ये व्यक्त करण्यात आली आहे.

पेगॅसस प्रकरणावरुन आता विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि माहिती तंत्रज्ञान संसदीय स्थायी समितीचे सभापती शशी थरूर यांनी इस्रायलचे एनएसओच्या पेगॅससद्वारे ४० हून अधिक भारतीय पत्रकारांचे फोन हॅक केल्याचा दावा करण्यात आल्यानंतर या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली आहे. यावरुन भारतीय जनता पक्षाने काँग्रेसवर निशाणा साधला आहे. भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करत यूपीए सरकारवर टीका केली आहे. “ज्यांनी कायम यंत्रणाचा यथेच्छ गैरवापर केला, हीच पाळतखोर मंडळी आकांडतांडव करताहेत” असे उपाध्ये यांनी म्हटले आहे.

Pegasus Snoopgate : इस्त्रायलच्या पेगॅससची स्वतंत्रपणे चौकशी करा; शशी थरुर यांची सरकारकडे मागणी

“९००० फोन व ५०० इमेल खाती यांवर काँग्रेसच्या नेतृत्वात असलेल्या यूपीएमध्ये पाळत ठेवली जात होती. प्रणव मुखर्जी अर्थमंत्री असताना त्यांच्या कार्यालयात नजर ठेवण्यात आली ज्यांनी कायम यंत्रणाचा यथेच्छ गैरवापर केला हीच पाळतखोर मंडळी आकांडतांडव करीत आहेत,” असे उपाध्ये यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

केशव उपाध्ये यांनी ट्विटसोबत एक बातमीसुद्धा पोस्ट केली आहे. या बातमीमध्ये माहिती अधिकाराखाली दर महिन्याला यूपीए सरकारला ९००० फोन, ५०० ईमेलवर पाळत ठेवत अशी माहिती समोर आली. प्रसेनजित मोंडल यांनी आरटीआय दाखल केला होता आणि गृह मंत्रालयाने (एमएचए) ६ ऑगस्ट २०१३  रोजी त्याला उत्तर दिले होते.

Explained: एका मिस कॉलने मोबाइल हॅक करु शकणारं पेगॅसस म्हणजे नेमकं काय?

दरम्यान, इस्रायली गुप्तहेर तंत्रज्ञान संस्थेच्या अनेक सरकारी ग्राहकांनी सूचिबद्ध केलेल्या माहितमधून ३०० हून अधिक भारतीय मोबाईल क्रमांकाचा समावेश आहे. हे मोबाईल क्रमांक मंत्री, विरोधी पक्षनेते, पत्रकार, विधिज्ञ, उद्योगपती, सरकारी अधिकारी, शास्त्रज्ञ, मानवी हक्क कार्यकर्ते आणि इतरांनी वापरलेले आहेत, असे शोधपत्रकारितेच्या ‘प्रोजेक्ट पिगॅसस’मधून उघड झाले आहे. यावरुन भारतात आता राजकारण सुरु झालं आहे.

‘पेगॅसस’ काय आहे?

जगभरातील महत्त्वाचे सुमारे १,४०० मोबाईल क्रमांक हॅक करण्यासाठी गुप्तहेरांनी ‘पेगॅसस’ या तंत्रज्ञानाचा वापर केला होता. ‘पेगॅसस’ हे हेरगिरी तंत्रज्ञान इस्रायलच्या एनएसओ या कंपनीने विकसित केले आहे, अशा बातम्या २०१९मध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. व्हॉटस अ‍ॅप या समाज माध्यम कंपनीने इस्रायली गुप्तहेर संस्था- ‘एनएसओ’ला न्यायालयात खेचण्याचा इशारा २०१९च्या ऑक्टोबरमध्ये दिला होता.