राम मंदिर निर्माणासाठी ज्यांनी बलिदान दिले, त्यांना खऱ्या अर्थाने आज शांती लाभली असेल, अशी भावना सरसंघचालक मोहन भागवत यांनी ध्वजारोहण सोहळ्याप्रसंगी व्यक्त केली.
भागवत म्हणाले की, “हा एक ऐतिहासिक आणि आनंददायी क्षण आहे. पूर्वजांनी केलेल्या संकल्पाची पूर्ती आता झाली आहे. या क्षणासाठी भारतीयांना खूप प्रतीक्षा करावी लागली. संपूर्ण मानवतेला भारतीय नीतिमूल्यांपासून शिकण्यासारखं खूप आहे. आनंद आणि शांतीची मूल्ये शिकवणारा भारताचा तो सुवर्णकाळ आपण आता निर्माण करायला हवा.”
पाच शतकांच्या संघर्षातही हिंदू समाजाने चिकाटी, संयम सोडला नाही. त्याच प्रयत्नांचे फळ आता मिळाले आहे. रामलल्ला अखेर मंदिरात प्रकट झाले आहेत. सत्य हे शाश्वत असते. ओमकार त्याचीच प्रचीती देतो. हे सत्य भारताने जगासमोर मांडायला हवं. धर्म, ज्ञान, आधार आणि सकारात्मकतेचा मार्ग दाखवणाऱ्या भारताच्या प्रगतीची पावले आता पडू लागली आहेत, असेही ते म्हणाले.
नवीन पर्वाची सुरुवात
राममंदिराच्या कळसावरील ध्वजारोहण म्हणजे एका नवीन पर्वाची सुरुवात आहे. त्यातून धर्माचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. मागील ११ वर्षांत संस्कृती आणि प्रगती यांची योग्य प्रमाणात सांगड घातली जात असून भगवा ध्वज विकसित भारताच्या दिशेने सुरू असलेल्या प्रवासाचे प्रतीक आहे, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ यांनी या वेळी सांगितले. देशाच्या नकाशामध्ये आतापर्यंत दुर्लक्षित ठरलेली अयोध्या आता जागतिक आध्यात्मिक राजधानी म्हणून नावारूपाला आली आहे, असे सांगत योगी यांनी त्याचे श्रेय पंतप्रधान मोदी यांना दिले.
राम मंदिरावर फडकणाऱ्या भगव्यामुळे नैतिक मूल्यांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. ही मूल्ये वैयक्तिक, कौटुंबिक जीवनाबरोबरच संपूर्ण विश्वाला आकार देतील. – डॉ. मोहन भागवत, सरसंघचालक
