three Indians abducted in Mali : पश्चिम आफ्रिकेतील माली या देशातील विविध भागात दहशतवादी हल्ले झाल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यांनंतर मालीमध्ये तान भारतीय नागरिकांचे अपहरण करण्यात आले आहे. या घटनेनंतर नागरिकांच्या सुरक्षेबद्दल बुधवारी भारताने गंभीर चिंता व्यक्त केल्या आहेत. अपहरणाच्या घटनेच्या धुसऱ्या दिवशी भारत सरकारने नागरिकांची सुरक्षित आणि लवकर सुटका करण्यासाठी आवश्यक असलेले सर्व उपाय करण्याचे आवाहन माली सरकारकडे केले आहे.
१ जुलै रोजी कायेस (Kayes) येथील डायमंड सिमेंट कारखान्यात काम करणाऱ्या या तीन भारतीय नागरिकांना कारखान्याच्या परिसरात झालेल्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान ओलिस ठेवण्यात आले होते.
परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, “ही घटना घडली… जेव्हा सशस्त्र हल्लेखोरांच्या गटाने कारखान्याच्या परिसरात एक सुनियोजित अहल्ला केला आणि तीन भारतीय नागरिकांना ओलीस ठेवले.”
सरकारने असेही म्हटले आहे की, “१ जुलै रोजी पश्चिम आणि मध्य माली येथील वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या अनेक लष्करी आणि सरकारी ठिकाणांवर दहशतवाद्यांकडून हल्ले करण्यात आले.
दरम्यान या अपहरणाची अद्याप कोणीही जबाबदारी घेतली नाही, मात्र अल-कायदाशी संबंधित गट जमात नुसरत अल-इस्लाम वाल-मुस्लिमिन (JNIM)ने त्याच दिवशी करण्यात आलेल्या मालीमधील इतर हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे.
भारताने या खेदजनक हिंसाचाराचा निषेध केला आहे. “भारत सरकारने… रिपब्लिक ऑफ माली सरकापला अपहरण झालेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षित आणि तात्काळ सुटकेसाठी आवश्य असलेले उपाय करण्याचे अवाहन करते,” असे परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की बामको (Bamko) येथील भारतीय दूतावास हा संबंधित मालियन अधिकारी, स्थानिक कायदा सुव्यवस्था राखणाऱ्या यंत्रणा आणि डायमंड सिमेंट फॅक्टरीचे व्यवस्थापन यांच्या सतत संपर्कात आहे. तसेच ते अपहरण झालेल्या नागरिकांच्या कुटुंबियांच्या देखील संपर्कात असल्याचे सांगण्यात आले आहे.
इतकेच नाही तर सध्याचे अस्थिर वातावरण पाहाता परराष्ट्र मंत्रालयाने नागरिकांसाठी सुरक्षेसंबंधीत मार्गदर्शक सूचना देखील जारी केल्या आहेत, ज्यामध्ये सध्या मालीमध्ये असलेल्या भारतीय नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे तसेच सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.