येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर स्फोटके निकामी करत असताना झालेल्या स्फोटामध्ये लेफ्टनंट कर्नल निरंजन कुमार शहीद झाले आहेत. आातापर्यंत दहशतवादी हल्ल्यात १० जवान शहीद झाले असून, ११ जवान जखमी झाले आहेत. तर दुसरीकडे सर्व दहशतवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश आले आहे.
पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डिफेन्स सर्व्हिस कोअरचे सहा, एअरफोर्स आणि ‘गरुड’चे प्रत्येकी दोन जवान शहीद झाले आहेत.  दरम्यान, पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर रविवारी सकाळी शोधमोहिम सुरु असताना, पुन्हा एकदा बॉम्बस्फोट झाला. शोधमोहिमे दरम्यान अतिरेक्यांनी पेरलेल्या आईडी स्फोटकांचा स्फोट झाला. यामध्ये एनएसजीचे तीन जवान जखमी झाले आहेत. प्रारंभी पठाणकोट तळावर पुन्हा गोळीबार, बॉम्बस्फोट झाल्याचे वृत्त आले होते. त्यामुळे सहावा दहशतवादी आतमध्ये असल्याची शक्यता निर्माण झाली होती. दरम्यान, राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) आठ सदस्यीय शोधपथकही घटनास्थळी दाखल झाले आहे. सुरक्षा दलाकडून सध्या कॉम्बिंग ऑपरेशन राबविण्यात येत असून ते अद्याप संपलेले नाही.
हवाई तळ उद्‌ध्वस्त करण्याच्या उद्देशाने काल पहाटे साडेतीनच्या सुमारास दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. हे सर्व जण पाकिस्तानस्थित जैशे महंमद या दहशतवादी संघटनेचे सदस्य असल्याचा अंदाज लष्करी सूत्रांनी व्यक्त केला आहे.