सौदी अरेबियात कामासाठी गेलेले तीन कामगार अखेर शनिवारी मायदेशी परतले. काही दिवसांपूर्वी तिघांवर झालेल्या अमानुष अत्याचाराचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.
सौदी अरेबियात नोकरी करत असताना तिन्ही कामगारांना मालकाकडून शारिरीक त्रास सहन करावा लागला होता. त्याचा व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यानंतर भारत सरकारने हस्तक्षेप करत या तिघांना पुन्हा भारतात परत आणले आहे. याविषयीची माहिती भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी प्रसिद्ध केली होती. स्वराज यांनी शुक्रवारी रात्री ते तिन्ही युवक भारतात परतत असल्याचे ट्विटवरून सांगितले होते. आज सकाळी सौदी अरेबियाच्या विमानातून त्रिवेंद्रम येथे हे तिन्ही युवक परतले. हे तिघेही केरळमधील अलापुझा जिल्ह्यातील हरिपाद येथील रहिवाशी आहेत.
एका प्लेसमेंट एजन्सीने केरळमधील हरिपाद गावातील तिन्ही तरुणांना यमनमध्ये इलेक्ट्रीशियन पदासाठी नोकरीचे आमिष दाखवले होते. एजन्सीने तिघांना यमन ऐवजी सौदीतील अभा शहरात पाठवले. तिथे त्यांना वीट भट्‍यावर काम करण्यास बळजबरी करण्‍यात आली. याकाळात त्यांना अमानुष मारहाणही करण्‍यात आली.