दिल्लीच्या रोहिणी न्यायालयात शुक्रवारी दोन हल्लेखोरांनी गुंड जितेंद्र गोगी याच्यावर केलेल्या गोळीबारात गोगी ठार झाला. याचवेळी पोलिसांनी प्रत्त्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात हल्लेखोरही मारले गेले. गोगी याच्यावर गोळीबार करणारे वकिलाच्या वेशात आले होते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

या हल्ल्याचे व्हिडीओ चित्रण उपलब्ध झाले असून त्यात दोन हल्लेखोर दिसत आहेत. ते गोगी याच्या प्रतिस्पर्धी टोळीतील आहेत. गोळीबाराचा आवाज होताच पोलीस आणि वकील यांची धावपळ उडाल्याचे दिसून येते. मात्र यानंतर पुढे कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा कोणी जखमीही झाले नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दिल्ली पोलिसांचे प्रवक्ते चिन्मय बिस्वाल म्हणाले की, कुख्यात गोगी हा कच्चा कैदी होता. तो आणि त्याच्यावर हल्ला करणारे दोघे जणही ठार झाले आहेत. दिल्ली पोलिसांनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, रोहिणी न्यायालयाच्या आवारात दुपारी ही घटना घडली. 

या घटनेचे प्रत्यक्षदर्शी असलेले अ‍ॅड. राजीव अग्निहोत्री यांनी सांगितले की, रोहिणी न्यायालयात आधी याच प्रकारच्या चार-पाच वेळा घडल्या असून स्थिती सुधारलेली नाही.

हल्लेखोरांच्या गोळीबारात ठार झालेला गुंड जितेंद्र मान ऊर्फ गोगी याच्यावर साडेसहा लाखांचे इनाम होते. त्याला गेल्या वर्षी मार्चमध्ये विशेष पथकाने गुरगाव येथून तीन साथीदारांसह अटक केली होती.