scorecardresearch

पश्चिम बंगालमधील अवैध फटाका कारखान्यात स्फोट ; तीन ठार, तर तिघे जखमी

स्फोटात जखमी झालेल्या इतर तिघांना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

पश्चिम बंगालमधील अवैध फटाका कारखान्यात स्फोट ; तीन ठार, तर तिघे जखमी
प्रतिनिधिक छायाचित्र

कोलकाता : पश्चिम बंगालच्या दक्षिण २४ परगणा जिल्ह्य़ात बुधवारी अवैध फटाका उत्पादन कारखान्यात झालेल्या स्फोटात ३ जण ठार, तर तिघे जखमी झाले.

या घटनेमुळे राजकीय वादळ उद्भवले आहे. तृणमूल काँग्रेस हिंसाचार घडवून आणण्यासाठी स्फोटकांचा साठा करत असल्याचा आरोप भाजपने केला आहे; तर फटाक्यांच्या स्फोटावरून भाजप ‘सवंग राजकारण’ करत असल्याचा आरोप राज्यातील सत्ताधारी पक्षाने केला आहे.

दक्षिण २४ परगणा जिल्ह्य़ाच्या नोदाखाली भागात आशीम मंडल याच्या मालकीच्या दोन मजली घरात बुधवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास हा स्फोट होऊन घराचा एक भाग उडाला. घरात एकूण ३ स्फोट झाले. घरमालक, तसेच कारखान्यात काम करणारी एक महिला व एक तिसरी व्यक्ती अशा तिघांचे मृतदेह घटनास्थळी आढळले. स्फोटात जखमी झालेल्या इतर तिघांना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

जखमींपैकी एकाचे हात स्फोटात तुटून पडले असून त्याची प्रकृती गंभीर आहे. या स्फोटामुळे आसपासच्या काही इमारतींचेही नुकसान झाले असल्याचे कळते. या घटनेबाबत तपास सुरू करण्यात आला आहे, असेही हा अधिकारी म्हणाला.

या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना, पश्चिम बंगाल स्फोटकांच्या साठय़ावर बसला असल्याचे या स्फोटामुळे सिद्ध झाले असल्याचे भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीप

घोष म्हणाले. या जिल्ह्य़ातील डायमंड हार्बर व इतर भागांत अशांतता पसरवण्यासाठी स्फोटके गोळा करण्यात येत असल्याचे मानण्यास आम्हाला जागा आहे.

उत्तर २४ परगणा व इतरत्रही अशाच घटना घडल्या आहेत. राज्याचे पोलीस याकडे कानाडोळा करतअसून योग्य तो तपास होत नाही, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. दक्षिण २४ परगणा जिल्हा हा शेजारच्या बांगलादेशातून येणाऱ्या जिहादींचा अड्डा झाला असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते शुभेंदु अधिकारी यांनी केला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-12-2021 at 01:19 IST

संबंधित बातम्या