तीन मजूर ठार; चारधाम यात्रा तात्पुरती स्थगित

मुसळधार पावसाने उत्तराखंडला सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी तडाखा दिला. यात नेपाळमधील ३ मजूर ठार, तर दोघे जखमी झाले. यामुळे हवामानात सुधारणा होईपर्यंत चारधाम यात्रा तात्पुरती थांबवणे प्रशासनाला भाग पडले आहे.

हे मजूर पौडी जिल्ह्यातील लँसडाऊननजीकच्या समखाल येथे एका तंबूत राहात होते. पावसामुळे उंच भागातून दगडविटांचे तुकडे खाली पडण्यास सुरुवात झाली आणि त्याखाली हे तिघे जिवंत गाडले गेले. हे लोक या भागातील एका हॉटेलच्या बांधकामावर होते. या घटनेतील जखमींना कोटद्वार बेस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे, असे जिल्हा दंडाधिकारी विजय कुमार जोगदंडे यांनी सांगितले.

दरम्यान, रविवारपर्यंत हरिद्वार व ऋषिकेशला येऊन पोहचलेल्या चारधाम यात्रेकरूंना हवामान सुरळीत होईपर्यंत पुढे न जाण्याची सूचना करण्यात आली असून, या यात्रेतील मंदिरांसाठी ये-जा करणाऱ्या वाहनांची वाहतूक तात्पुरती थांबवण्यात आली आहे.

प्रवासी वाहनांना ऋषिकेशमधील चंद्रभागा पूल, तपोवन, लक्ष्मण झुला व मुनी-की-रेती भद्रकाली हे अडथळे पार करण्याची परवानगी नाकारण्यात येत आहे.

मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी हवामानाची ताजी स्थिती जाणून घेण्यासाठी, तसेच रस्ते व महामार्गांची स्थिती समजून घेण्यासाठी येथील सचिवालयातील राज्याच्या आपदा व्यवस्थापन नियंत्रण कक्षाला भेट दिली. हवामान सुरळीत होईपर्यंत यात्रा दोन दिवस लांबणीवर टाकावी, असे आवाहन त्यांनी यात्रेकरूंना केले.

दरम्यान, उत्तर भारताच्या अनेक भागांना सोमवारी जोरदार पावसाचा तडाखा बसला.  दिल्लीत ऑक्टोबर महिना १९६० नंतर सर्वाधिक पावसाचा महिना ठरला आहे. त्यावेळी या महिन्यात ९३.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. यावर्षी आतापर्यंत ९४.६ मिलिमीटर पाऊस पडला आहे.

राजस्थान, पश्चिम बंगाल, तमिळनाडू, पुदुच्चेरी, हरियाणा, मध्यप्रदेश,उत्तरप्रदेश व तेलंगण याराज्यांच्या अनेक भागांना मुसळधार पावसाने तडाखा दिला आहे.

जोरदार पावसामुळे मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी लोकसभा पोटनिवडणूक होत असलेल्या खंडवा येथील आपला प्रचारदौरा स्थगित केला. उत्तर प्रदेशात बुधना येथील सभास्थळ पाण्यात बुडाल्याने समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांची सभा रद्द करावी लागली.