scorecardresearch

Turkey-Syria Earthquake : टर्की-सीरियात महाविध्वंस! २४ तासांत तीन मोठे भूकंप; मृतांचा आकडा ४ हजारवर; भारताकडूनही मदत

टर्की आणि सीरियामध्ये गेल्या २४ तासांत तीन मोठे भूकंपाचे धक्के बसले.

turkey earthquake
एएनआय वृत्तसंस्था

टर्की आणि सीरियामध्ये गेल्या २४ तासांत तीन मोठे भूकंपाचे धक्के बसले. एकापाठोपाठ एक झालेल्या भूकंपामुळे अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या असून यात ४ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. तर १५ हजारापेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत. अद्यापही बचावकार्य सुरू असून भारतातूनही राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) दोन टीम टर्कीला रवाना झाल्या आहेत.

हेही वाचा – टर्की पुन्हा हादरले! दक्षिण टर्कीतील कहरामनमारा प्रांतात भूकंपाचे जोरदार धक्के; मृतांची संख्या १३०० पार

पहिला भूकंप

सोमवारी पहाटे चार वाजता टर्कीमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के बसले. या भूकंपाची तीव्रता ७.८ रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली होती. युनायटेड स्टेट्स जिऑलॉजिकल सर्वेने (USGS) दिलेल्या माहितीनुसार या भूकंपाचं प्रमुख केंद्र गाझियान्टेप या शहरापासून ३३ किलोमीटर अंतरावर, तर नूर्दगी शहरापासून २६ किमी अंतरावर होते. तसेच हा भूकंप जमिनीपासून जवळपास १४.१ किलोमीटर खोलीवर झाला होता.

दुसरा भूकंप

सोमवारी सकाळी भूकंपाचे धक्का जाणवल्यानंतर सायंकाळी ५ च्या सुमारास कहरामनमारा प्रांतातील एल्बिस्तान जिल्ह्यात दुसरा भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता ७.६ रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली

तिसरा भूंकप

दरम्यान, दोन भूकंपाचे धक्का बसल्यानंतर सोमवारी रात्री पुन्हा एकदा टर्कीत भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता ६.० रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली.

हेही वाचा – न्यायमूर्तीपदी व्हिक्टोरिया गौरी यांच्या नियुक्तीला आव्हान, याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज तातडीने सुनावणी 

बचावकार्य युद्धपातळीवर

टर्कीचे उप-राष्ट्रपती फुआत ओकते यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ११ हजार ०२२ जणांचा शोध घेण्यात आला असून ७ हजार ८४० जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले आहे. तसेच तीन लाखांपेक्षा जास्त भूकंपग्रस्तांना वसतिगृहे आणि विद्यापीठांमध्ये ठेवण्यात आले आहे.

भारतातून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या टीम रवाना

दरम्यान, भूकंपामुळे टर्कीमध्ये शेकडो इमारती जमीनदोस्त झाल्या असून भूंकपग्रस्त भागात बचावकार्य सुरू आहे. भारतही टर्कीच्या मदतीसाठी पुढे आला आहे. बचावकार्यासाठी भारत सरकारने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) टीम टर्कीला पाठवण्याचा निर्णय घेतला असून सोमवारी रात्री या टीम टर्कीसाठी रवाना झाल्या आहेत.

भारत टर्कीच्या पाठीशी उभा -पंतप्रधान मोदी

टर्कीच झालेल्या भूकंपांमुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शोक व्यक्त केला आहे. भारत टर्कीतील लोकांच्या पाठीशी उभा आहे. या संकटाला तोंड देण्यासाठी भारत सरकार सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे. या विनाशकारी भूकंपाचा सीरियावरही परिणाम झाला आहे. हे जाणून खूप दुःख झालं आहे. पीडितांच्या कुटुंबियांप्रती माझ्या मनापासून संवेदना, असं ट्वीट पंतप्रधान मोदी यांनी केले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2023 at 07:41 IST
ताज्या बातम्या