Ghaziabad Sisters Suicide: ऑनलाइन गेमिंगचे व्यसन लहान मुलांमध्ये झपाट्याने पसरत असून या व्यसनाचे दुष्परिणामही दिसत आहेत. मुलांचे हे गेमिंग व्यसन अनेक पालकांसाठी डोकेदुखी ठरताना दिसत आहे. उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये एकाच घरातील तीन सख्या बहिणींनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. बुधवारी पहाटे गाझियाबाद मधील एका इमारतीच्या नवव्या मजल्यावर राहणाऱ्या एका कुटुंबातील तीन बहिणींनी एकामागोमाग उड्या घेत आत्महत्या केली.

गाझियाबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत बहिणींचे वय १२, १४ आणि १६ वर्ष आहे. तिघीही ऑनलाइन टास्क बेस्ड गेमच्या विळख्यात अडकल्या होत्या. यावरून त्यांच्या पालकांनी संताप व्यक्त केला होता. यानंतर मुली नाराज होत्या.

पोलिसांनी सांगितले की, पहाटे २ वाजता स्थानिकांना इमारतीवरून खाली काहीतरी पडल्याचा आवाज आला. यावेळी तीनही मुली रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आढळल्या. स्थानिकांनी मुलींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले.

गाझियाबादच्या शालीमार गार्डन येथील सहाय्यक पोलीस आयुक्त अतुल कुमार सिंह यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, पहाटे २.१५ वाजता आम्हाला या घटनेची माहिती मिळाली. सिंह यांनी पुढे म्हटले की, आम्ही या घटनेचा तपास सुरू केला आहे. घटनास्थळी पोहोचताच तिनही मुलींना रुग्णवाहिकेतून लोणी येथे असलेल्या ५० बेडच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.

gaziabad suicide note
आत्महत्या करण्यापूर्वी बहिणींनी सुसाईड नोट लिहिली होती.

इंडिया टुडेने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना घरात सुसाईड नोट आढळली आहे. ज्यात हिंदी आणि इंग्रजीमध्ये मुलींनी आपल्या भावना व्यक्त केल्या असून हिंदी, इंग्रजीमध्ये मजकूर लिहून ठेवला आहे. मम्मी-पप्पा आम्हाला माफ करा, असे लिहून रडतानाचा एक इमोजी या सुसाईड नोटवर काढल्याचे पोलिसांनी म्हटले.