देशातली सर्वात मोठी एअरलाइन्स कंपनी असलेल्या इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्स यांनी अखेर त्यांच्या सीईओ पदाचा राजीनामा दिला आहे. नव्या सीईओंच्या नियुक्तीपर्यंत मॅनेजिंग डायरेक्टर राहुल भाटिया यांच्याकडे कंपनीची अंतरिम जबाबदारी असेल. कंपनीने सांगितलं की पीटर एल्बर्स यांचा राजीनामा १० मार्च २०२६ पासूनच ग्राह्य धरला गेला आहे असंही कंपनीने स्पष्ट केलं आहे. पीटर एल्बर्स यांनी कंपनीसाठी जे योगदान दिलं त्याबाबत आम्ही त्यांचे धन्यवाद देतो. त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी आम्ही शुभेच्छा देतो असंही कंपनीने म्हटलं आहे. तसंच लवकरच नव्या सीईओंची नियुक्ती होईल अशी अपेक्षाआम्हाला आहे असंही कंपनीने म्हटलं आहे.
पीटर एल्बर्स यांच्या राजीनाम्याची चर्चा का होते आहे?
पीटर एल्बर्स यांचा राजीनामा डिसेंबर महिन्यात झालेल्या मोठ्या संकटानंतर झाला आहे.
इंडिगोने डिसेंबर महिन्यात जी कामगिरी केली ती कंपनीची सर्वात वाईट कामगिरी ठरली होती.
डिसेंबर महिन्यात कंपनीवर जे संकट ओढवलं त्यानंतर एअरलाइन कंपनीची अनेक उड्डाणं रद्द झाली होती. कंपनीवर असं करण्याची नामुष्की ओढवली होती.
इंडिगो कंपनीला या सगळ्या संकटामुळे सामान्य लोकांकडून तसंच महत्त्वाच्या लोकांकडून टीकेचा मोठ्या प्रमाणावर सामना करावा लागला. सरकारी पातळीवरही चौकशीला सामोरं जावं लागलं.
यानंतर आता पीटर एल्बर्स यांनी राजीनामा दिला असून तो तातडीच्या प्रभावाने मंजूर करण्यात आला आहे.
डिसेंबर महिन्यात कंपनीवर सर्वात मोठी नामुष्की ओढवली
पीटर एल्बर्स हे मागच्या ३० वर्षांपासून अॅव्हिएशन व्यवसायात कार्यरत आहेत. २०२२ मध्ये इंडिगो ही कंपनी त्यांनी सीईओ म्हणून जॉईन केली होती. इंडिगो कंपनीत येण्यापूर्वी पीटर एल्बर्स हे डच कॅरिअर KLM चे अध्यक्ष आणि सीईओ होते. या कंपनीत त्यांनी आठ वर्षे सेवा दिली. इंडिगोमध्ये जेव्हा पीटर एल्बर्स आले त्यानंतर तीन वर्षांच्या त्यांच्या कार्यकाळात इंडिगोने १० अरब डॉलर्सहून अधिक महसूल गोळा केला. तसंच विमानांची संख्या ४४० पर्यंत नेण्यावर कंपनीने मजल मारली. अशातच डिसेंबर २०२५ महिन्यात कंपनीसमोर संचलनाचं संकट आलं. या संकटामुळे कंपनीला २५०० उड्डाणं रद्द करावी लागली आणि इंडिगो कंपनीवर नामुष्की ओढवली. या संकटामुळे ३ लाख हून अधिक नागरिकांना फटका बसला. या घटनेनंतर DGCA ने कंपनीला २२ कोटी २० लाख रुपयांचा दंड ठोठावला. तसंच पीटर एल्बर्स यांना कारणे दाखवा नोटीसही बजावली. डिसेंबरमध्ये आलेल्या संकटामुळे कंपनीच्या विश्वासार्हतेला तडा गेला. ज्यानंतर आता पीटर यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.
नव्या सीईओ समोर दोन प्रमुख आव्हानं
पीटर एल्बर्स यांनी राजीनामा देणं हे इंडिगोच्या वाटचालीतलं एक महत्त्वाचं वळण आहे. आता इंडिगो कंपनीत नवा सीईओ कोण येणार आणि काय काय बदल केले जाणार हे पाहणंही महत्त्वाचं असेल. नव्या सीईओसमोर इंडिगोच्या विमानांची उड्डाणं व्यवस्थित सुरु ठेवणं आणि सरकार तसंच लोकांचा विश्वास पुन्हा संपादन करणं ही दोन मोठी आव्हानं असणार आहेत. सध्या राहुल भाटियांच्या नेतृत्वात कंपनी नव्या सीईओचा शोध घेते आहे. त्यामुळे इंडिगोचा नवा सीईओ कोण असेल हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे.
