scorecardresearch

मध्य प्रदेशात ‘पीएफआय’च्या तिघांना अटक

यामुळे गेल्या काही दिवसांत पीएफआयच्या चार सदस्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

three more members of banned pfi arrested
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या बंदी घातलेल्या संघटनेच्या तीन सदस्यांना मध्य प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. (संग्रहित छायाचित्र) ; फोटो- इंडियन एक्स्प्रेस(file photo)

भोपाळ : सरकारविरुद्ध कट केल्याच्या आणि बेकायदेशीर कारवायांत गुंतल्याच्या आरोपांखाली पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या बंदी घातलेल्या संघटनेच्या तीन सदस्यांना मध्य प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. यामुळे गेल्या काही दिवसांत पीएफआयच्या चार सदस्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

 ताज्या कारवाईत, मध्य प्रदेश पोलिसांच्या विशेष कृती दलाने (एसटीएफ) पीएफआयच्या दोन सदस्यांना शनिवारी मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये, तर तिसऱ्याला औरंगाबाद येथून प्रॉडक्शन वॉरंटवर आणून अटक केल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

 अटक केलेल्यांपैकी गुलाम रसूल शाह (३७) हा धार जिल्ह्याचा, साजिद खान ऊर्फ गुलाम नबी (५६) हा इंदूरचा, तर परवेझ खान (३०) हा औरंगाबादचा रहिवासी आहे. सरकारविरुद्ध युद्ध पुकारण्यासाठी कारस्थान रचणे, राष्ट्रीय एकतेला घातक कृती करणे व फौजदारी स्वरूपाचा कट या आरोपांसह बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदींनुसार त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 परवेझ खान हा औरंगाबादच्या कारागृहात होता. तो २०१७  पासून पीएफआयशी संलग्न होता आणि संघटनेच्या सदस्यांना शारीरिक प्रशिक्षण देण्यासाठी तो अनेकवेळा मध्य प्रदेशात आल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-02-2023 at 03:59 IST