काश्मीरमधील चकमकीत तीन पाकिस्तानी दहशतवादी ठार, एक पोलीस शहीद

जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात बुधवारी सुरक्षा दलांशी झालेल्या ‘आकस्मिक’ चकमकीत जैश-ए-मोहम्मद संघटनेचे तीन पाकिस्तानी दहशतवादी ठार झाले.

terrorist
संग्रहित छायाचित्र

पीटीआय, श्रीनगर : जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात बुधवारी सुरक्षा दलांशी झालेल्या ‘आकस्मिक’ चकमकीत जैश-ए-मोहम्मद संघटनेचे तीन पाकिस्तानी दहशतवादी ठार झाले. कीरी भागात झालेल्या या चकमकीत एक पोलीस शहीद झाला.  सुरक्षा दलांनी काश्मीर खोऱ्यात सर्वत्र लावलेल्या नाकाबंदीदरम्यान एका तपासणी नाक्यावर ही चकमक झाल्याची माहिती काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी दिली.

 ‘आज (बुधवारी) काश्मिरात सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली होती. कीरी भागातील नाजिभाट चौकातील अशाच एका नाक्यावर दहशतवाद्यांशी आकस्मिक चकमक झडली. यात जैशचे तीन पाकिस्तानी दहशतवादी मारले गेले. चकमकीत एका पोलिसानेही जीव गमावला’, असे कुमार यांनी पत्रकारांना सांगितले.

 हे तिन्ही दहशतवादी गेल्या तीन ते चार महिन्यांपासून गुलमर्गच्या पर्वतीय भागात सक्रिय होते आणि आम्ही त्यांच्यावर पाळत ठेवून होतो. या वर्षांत आतापर्यंत सुरक्षा दलांसोबतच्या निरनिराळय़ा चकमकींत २२ पाकिस्तानी दहशतवादी मारले गेले असून, पाकिस्तानी दहशतवाद्यांना संपवण्याचे आणखी प्रयत्न केले जातील, असे कुमार म्हणाले.  मंगळवारी श्रीनगरच्या सौरा भागात एका पोलिसाला ठार मारण्यात आलेल्या हल्ल्याबद्दल विचारले असता, या हल्ल्यामागील लष्कर-ए-तैयबाच्या दोन दहशतवाद्यांची ओळख पटली असून, आम्ही त्यांना लवकरच संपवू, असा विश्वास कुमार यांनी व्यक्त केला.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Three pakistani militants killed one policeman killed kashmir clashes ysh

Next Story
श्रीलंकेच्या अर्थखात्याची धुरा रानिल विक्रमसिंघे यांच्या खांद्यावर
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी