Three Sisters Suicide in Gaziabad : गाझियाबादच्या भारत सिटी हाऊसिंग सोसायटीमध्ये १२, १४ आणि १६ वर्षाच्या तीन बहिणींनी सामूहिक आत्महत्या केली. कोरिअन गेम्सच्या व्यसनामुळे या बहिणींचा जीव गेला आहे. दरम्यान, या घटनेचे एकमेव साक्षीदार असलेल्या अरुण सिंग आणि त्यांची मेहुणी अपर्णा यांनी या घटनेची सविस्तर माहिती दिली.
बिहारमधील गया येथील रहिवासी आणि सोसायटीमध्ये भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहणारे अरुण बुधवारी दुपारी द इंडियन एक्सप्रेसला म्हणाले की, मला वाटलं की दोन मोठ्या बहिणी एकत्र पडल्या आणि त्यांना वाचवण्यासाठी तिसरी बहिण पुढे आली असावी.
प्रत्यक्षदर्शीने काय सांगितलं?
“मी मुलींच्या टॉवरसमोर असलेल्या टॉवरमध्ये १० व्या मजल्यावर राहतो. रात्री २ च्या सुमारास, मी झोपण्यापूर्वी माझ्या बाल्कनीत उभा होतो आणि मला सर्वात मोठी मुलगी समोरच्या टॉवरमध्ये ९ व्या मजल्यावर असलेल्या त्यांच्या खिडकीच्या कडेला बसलेली दिसली. खिडकीचा स्लाइडिंग पॅनल उघडा होता, ती खोलीकडे तोंड करून होती आणि तिची पाठ माझ्याकडे होती. खिडकीच्या चौकटीवर बसून ती पुढे-मागे डोलत असल्याचे दिसून आले”, अरुण यांनी दि इंडियन एक्सप्रेसला सांगितले.
अरुण म्हणाले की ते दृश्य त्यांना विचित्र आणि धोकादायक वाटले आणि त्यांनी अपर्णाला हाक मारली. अपर्णा लागलीच बाहेर आली पण तिने चष्मा घातला नसल्याने ती चष्मा घेण्याकरता आत गेली. “दुसऱ्या बहिणीने मोठ्या बहिणीला मिठी मारली होती आणि त्या दोघी एकत्र डोलत होत्या. अचानक, मोठी बहीण मागे खिडकीतून खाली पडली आणि तिला पकडलेली दुसरी बहीण तिच्यासोबतच खाली पडली. सर्वात धाकटी बहीणही खिडकीजवळ होती. ती या दोन बहिणींना पकडण्यासाठी पुढे सरकली, पण तीही तोल जाऊन खाली पडली असावी”, अशी माहिती अरुण यांनी दिली.

मुली खाली पडत असताना मोठा आवाज झाला
या मुली खाली पडत असताना इमारतीच्या बाहेरच्या काही भागांना धडकल्या, त्यामुळे मोठा आवाज आला. सोसायटीतील रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, मुली खाली पडल्याचं लक्षात येताच त्यांचं कुटुंब खाली आले. आपल्या मृत मुलींना पाहून पालकही थरथरत होते.”
रहिवाशांनी सांगितले की मुलींच्या वडिलांनी दोनदा लग्न केले होते आणि त्याच्या दोन्ही बायका बहिणी होत्या, परंतु, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. महत्त्वाचं म्हणजे हे कुटुंब या सोसायटीत भाड्याने राहत होते. इतर रहिवाशांमध्ये ते मिसळत नसत. त्यामुळे शेजारील लोकांना त्यांच्याविषयी फारसं काही माहीत नाही. बुधवारी द इंडियन एक्सप्रेसने या इमारतीत भेट दिली असता त्या फ्लॅटला कुलूप असल्याचे निदर्शनास आले.

