पाकव्याप्त काश्मीरमध्ये शनिवारी रिसर्च अँण्ड अॅनालिसिस विंगचे ( रॉ) एजंट असल्याच्या संशयावरून तिघांना अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानमधील ‘डॉन’ दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार या तिघांना पाकिस्तानविरोधी कारवाया केल्याच्या संशयावरून अटक केल्याचा दावा स्थानिक पोलिसांनी केला आहे.

रवाळकोट येथे झालेल्या पत्रकारपरिषदेत या संशयितांचे चेहरे झाकून पोलिसांनी त्यांना प्रसारमाध्यमांसमोर आणले होते. मोहम्मद खलिल, इम्तियाज आणि रशिद अशी या संशयितांची नावे आहेत. हे तिघे अब्बासपूरमधील टरोटी गावचे राहणारे आहेत. पुंछचे पोलीस उप अधीक्षक साजिद इम्रान यांनी दिलेल्या माहितीनुसार, यापैकी मुख्य संशयित असणारा खलिल नोव्हेंबर २०१४ मध्ये काश्मीरमध्ये नातेवाईकांना भेटण्यासाठी गेला होता. याठिकाणी तो ‘रॉ’च्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आला होता. त्यांनी खलिलला ‘रॉ’च्या कामात सामील करून घेतले. इंट्रा- काश्मीर ट्रॅव्हल परमिट मिळवल्यानंतर खलिलने ‘रॉ’साठी काम सुरू केले. पाकिस्तानमध्ये परतल्यानंतर खलिलने इम्तियाज आणि रशीद यांनादेखील आपल्या साथीला घेतले. आपण अनेकदा एलओसी पार केल्याची कबुली खलीलने पोलिसांनी दिली.

याशिवाय, या तिघांचाही सप्टेंबर महिन्यात अब्बासपूर येथील पोलीस स्टेशनबाहेर झालेल्या बॉम्बस्फोटातही समावेश होता. या तिघांनी मिळून पोलीस स्टेशनच्या परिसरात आयईडी स्फोटके ठेवल्याचे पोलिसांनी सांगितले. या कामगिरीसाठी खलीलला पाच लाख रूपये देण्यात आले होते. याप्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांना यामध्ये खलिल आणि त्याच्या साथीदारांचा समावेश असल्याचे आढळून आले. एका व्यक्तीने स्फोटाच्या दिवशी या तिघांना बॅग घेऊन अब्बासपूरमध्ये पाहिल्याचे सांगितले होते. त्याआधारे पोलिसांनी कारवाई करत या तिघांना ताब्यात घेतले. या तिघांवरही दहशतवादविरोधी कायदा आणि स्फोटक कायद्याखाली आरोप ठेवण्यात आले आहेत.

पाकिस्तानने नुकतीच ‘रॉ’चे हेर असल्याच्या आरोपावरून भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना दोषी ठरवत मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली होती. मात्र, भारताने पाकिस्तानचा हा दावा फेटाळून लावला होता.