पीटीआय, नवी दिल्ली : भाजपने सोमवारी मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी ३९ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यात नरेंद्र सिंह तोमर, प्रल्हाद सिंह पटेल आणि फग्गन सिंह कुलस्ते या तीन केंद्रीय मंत्र्यांसह चार खासदारांचा समावेश आहे. उमेदवारी जाहीर झालेल्या खासदारांत भाजपचे लोकसभेतील मुख्य प्रतोद राकेश सिंह, सिधी मतदारसंघातून प्रतिनिधित्व करणाऱ्या रिती पाठक, सतनाचे गणेश सिंह आणि नर्मदापुरमचे उदयप्रताप सिंह यांचा समावेश आहे.
तसेच पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांना इंदूर-१ मधून उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपने आतापर्यंत राज्यातील ७८ उमेदवारांची घोषणा केली. मध्य प्रदेशात काँग्रेसचे आव्हान लक्षात घेता पक्षाने केंद्रीय मंत्री, खासदारांना विधानसभेची उमेदवारी देत राज्यात सत्ता राखण्याचे प्रयत्न चालविले आहेत. यापैकी अनेक जण लोकसभेवर अनेक वेळा निवडून आले आहेत.




‘रालोआ’त परतणार नाही -नितीशकुमार
पाटणा : एक वर्षांपूर्वी त्याग केलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) परतण्याची शक्यता बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सोमवारी फेटाळून लावली. याला प्रत्युत्तर देताना, नितीश यांनी परत येण्यासाठी गयावया केल्या, तरी त्यांचे स्वागत केले जाणार नाही, असे भाजपने सांगितले.