खासदार संजय राऊत यांनी अमित शाह यांची नजर कमकुवत झाली आहे म्हणत त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तसंच जे भाजपाला मतदान देत नाहीत ते अमित शाह यांच्यासाठी घुसखोर आहेत असंही संजय राऊत म्हणाले. एवढंच नाही सीजेपीच्या आंदोलकांना तिरंगा फडकवल्याबद्दल अटक करण्यात आली आहे आता अमित शाह यावर का बोलत नाहीत? असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

ज्ञानेश कुमार यांनी लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम केलं. त्याविरोधात देशभरात आक्रोश पाहण्यास मिळतो आहे. तसंच दिल्ली, मुंबईसह देशभरात आंदोलनं होत आहेत. या सगळ्या आंदोलनावर आणि आक्रोशावर ज्यांनी आत्तापर्यंत तोंड बंद ठेवलं ते अमित शाह प्रकट झाले आणि म्हणाले की सोमवारचा जो मोर्चा झाला तो दीड किमीच्या क्षेत्रात ८ हजार लोक होते. मला वाईट वाटतंय की गृहमंत्री अमित शाह यांची नजर कमजोर झाली आहे आणि डिप्रेशनमध्ये गेले आहेत. निराशेने त्यांना ग्रासलं आहे. लाखोंच्या मोर्चात ८ हजार डोकी मोजली कुणी? असा खोचक प्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे. देशाच्या आरोग्यमंत्र्यांनी त्यांच्याकडे पथक पाठवून चाचणी करावी असंही संजय राऊत म्हणाले. अमित शाह यांची दूरची आणि जवळची नजर कमकुवत झाली आहे, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

जंतरमंतरवर बंदी का घातली गेली?

सोमवारी दिल्लीत अडीच लाख पोलीस तैनात होते. अमित शाह यांच्या घराभोवतीचा पाच किमीचा परिसर पोलीस बंदोबस्तानी तुम्ही प्रतिबंधित केला होता. २०२९ ला आम्ही पु्न्हा जिंकून येऊ असं अमित शाह म्हणाले. मला वाटतं त्यांच्या तोंडून ज्ञानेश कुमार बोलतो आहे. देशभरात १२ कोटी नावं ज्यानी वगळली तो ज्ञानेश कुमारच अमित शाह यांच्या तोंडून बोलत आहेत. अमित शाह २०२९ पर्यंत अमित शाह गृहमंत्री राहणार नाहीत, मोदी पंतप्रधान राहणार नाहीत. त्यामुळेच त्यांना वैफल्य आणि निराशा आली आहे. जंतरमंतर लॉकडाऊन का केलंत? याचं उत्तर द्या असंही संजय राऊत म्हणाले.

आमच्या आंदोलनाची पद्धत वेगवेगळी असेल-राऊत

आमच्या आंदोलनाची पद्धत वेगवेगळी असेल. प्रत्येकवेळी मोर्चाच काढला जाईल असं नाही. सध्या सण आणि उत्सव आहेत. त्यामुळे आम्ही वेगळ्या पद्धतीने आंदोलनं करणारच आहोत. रामलीला मैदानावर काही करता येईल का? याचाही विचार आम्ही करतो आहे. भ्रष्ट ज्ञानेश कुमार लवकरच जाईल याची आम्हाला खात्री आहे. अमित शाह यांनाही त्याची खात्री आहे असंही संजय राऊत म्हणाले आहेत. भाजपाला जे मत देत नाहीत ते अमित शाह यांच्यासाठी घुसखोर आहेत असंही राऊत यांनी म्हटलं आहे. ज्ञानेश कुमार हा माफिया आहे आणि सीमा खन्ना लेडी डॉन आहे निवडणूक आयोगातली. त्यांना संरक्षण देण्यात आलं आहे, हे गुंडांना संरक्षण आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

तिरंगा फडकवल्याबद्दल तीन तरूणांना अटक करण्यात आली आहे-राऊत

सीजेपीच्या तीन तरूणांना तिरंगा फडकवला म्हणून अटक करण्यात आली आहे. तिरंगा फडकवल्याबद्दल जर तरूणांना अटक केली तर हे घुसखोरांचं सरकार आहे, ईस्ट इंडिया कंपनीचं सरकार आहे. कुठे आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ? तिरंगा फडकवल्याबद्दल तीन तरूणांना अटक झाली आहे तर अमित शाह कुठे आहेत? तिरंगा फडकवल्याबद्दल तुरुंगवास होतो आहे, त्यावर अमित शाह बोलणार का? असा प्रश्न राऊत यांनी विचारला आहे.