वाराणसी या ठिकाणी नीट आणि एमसएसीची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनीच्या हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या विद्यार्थिनीचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट समोर आला आहे. पोस्टमॉर्टेमच्या अहवालात ही माहिती समोर आली आहे की विद्यार्थिनीचा गळा चिरून तिच्या डोक्यावर जोरदार वार करण्यात आला. तिचे पायही बांधण्यात आले होते. हत्येच्या आधी तिच्यावर बलात्कार करण्यात आला असावा अशीही शंका या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. आता डॉक्टरांनी या मुलीवर बलात्कार झाला होता का या गोष्टीची पुष्टी करण्यासाठी स्लाईड फॉरेन्सिककडे पाठवण्यात आल्या आहेत. पोस्टमॉर्टेमचा अहवाल समोर आल्यानंतर पोलिसांनी हत्या, बलात्काराची शक्यता, लैंगिक शोषण या बाबी अन्वये गुन्हा नोंदवत मुख्य आरोपी विवेक चौबेच्या अटकेसाठी आठ पथकं तयार केली आहेत. १० संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात येते आहे.

नेमकं प्रकरण काय?

वाराणासीतल्या रोहनिया भागात राहणाऱ्या २२ वर्षीय विद्यार्थिनीचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह एका भाडे तत्वावरच्या खोलीतल्या बाथरुममध्ये मिळाला होता. ही विद्यार्थिनी १८ ऑगस्टपासून बेपत्ता होती. तिचा मृतदेह २० ऑगस्टला सापडला. तिचा दूरचा नातेवाईक असलेला विवेक चौबे हा या प्रकरणातला मुख्य आरोपी आहे. विवेक चौबेला हे कळलं होतं की श्रेयाचं लग्न ठरलं आहे. तसंच तिच्या नावे ७ गुंठे जमीन आहे. याच सगळ्या प्रकरातून तिचं अपहरण करण्यात आलं. त्यानंतर गळा चिरुन तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विवेक चौबेच्या वडिलांना ताब्यात घेतलं आहे. तसंच ज्या खोलीत या मुलीचा मृतदेह सापडला त्या खोलीच्या मालकालाही ताब्यात घेतलं आहे. आता या मुलीच्या शवविच्छेदन अहवालात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मुलीच्या मृतदेहावर अंत्यंस्कार करण्यात आले

या मुलीच्या कुटुंबाने तिच्यासोबत काहीतरी चुकीचा प्रकार घडला असावा अशी शंका व्यक्त केली होती. ज्यानंतर तिचा शोध पोलिसांनी सुरु केला होता. तिचा शोध पोलीस ती बेपत्ता झाल्यापासून दोन दिवस घेत होते. अखेर एका खोलीत तिचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात सापडला होता. ही घटना जिथे घडली होती तिथला सीसीटीव्हीही खराब झाला आहे. पोलिसांनी श्रेयाचा मोबाइल आणि लॅपटॉप ताब्यात घेतला आहे. तिच्यावर बलात्कार झाला होता का? तिचं लैंगिक शोषण करण्यात आलं होतं का? यासाठी तिच्या व्हिसेराचे नमुने फॉरेन्सिकला पाठवण्यात आले आहेत. या घटनेनंतर मुलीच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. मुलीच्या वडिलांसह तिच्या कुटुंबाने तिच्या पार्थिवाला साश्रू नयनांनी निरोप दिला.

विवेक चौबेबाबत पोलिसांनी काय सांगितलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विवेक चौबे मागच्या तीन वर्षांपासून त्याच्या मामाकडे राहात होता. तो ग्रामपंचायत निवडणूक लढवणार होता. मात्र त्याचे काका अनिल चौबे आणि त्याच्यात यावरुन वाद सुरु होता. श्रेयाच्या हत्येनंतर तो फरार आहे. पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.