विज्ञान क्षेत्रातील संशोधनात नावाजलेली संस्था टाटा इंस्टिट्युट ऑफ फंडामेंटल रिसर्चने (TIFR) आपल्या कर्मचाऱ्यांना सोशल मीडियावर कोणतीही सरकार विरोधातील पोस्ट न करण्याचे निर्देश दिले आहेत. इतकंच नाही तर कर्मचाऱ्यांनी आपल्या कुटुंबीयांना देखील अशा प्रकारची सरकार विरोधी पोस्ट न करण्यास सांगावे, अशाही सूचना करण्यात आल्या आहेत. या निर्णयावर आक्षेपही घेतला जात आहे. तसेच हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला असल्याचं मतही व्यक्त केलं जात आहे.

कर्मचाऱ्यांना सोशल मीडियावर सरकारविरोधी पोस्ट न करण्याचे निर्देश

टीआयएफआरच्या प्रशासनाने १३ एप्रिलला जारी केलेल्या पत्रात अणुऊर्जा विभागाच्या (DAE) निरिक्षणांचा संदर्भ दिला आहे. यात अणुऊर्जा विभागातील काही कर्मचारी फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इतर सोशल मीडियावर सरकारविरोधी फोटो, व्हिडीओ पोस्ट करत असल्याचं म्हटलंय.

“सुरक्षेविषयक अडचणी तयार होऊ शकतात”

टीएफआरच्या पत्रात म्हटलं आहे, “काही कर्मचारी सोशल मीडियावर सरकारच्या विरोधात पोस्ट करत असल्याचं निदर्शनास आलं आहे. याबाबत तपास यंत्रणा आणि विभागाकडून इशारा देण्यात आला आहे. विभागाच्या कर्मचाऱ्यांनी संस्था, केंद्र, निवासी वसाहती किंवा इतर सरकारी मालमत्तेचे कोणतेही फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करू नयेत. यामुळे सुरक्षेविषयक अडचणी तयार होऊ शकतात.”

हेही वाचा : “हा कायदा संपूर्णपणे पोलीसराज निर्माण करेल कारण…”, महुआ मोईत्रांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

“विभागातील कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियावर सरकारविरोधी कोणतीही पोस्ट करू नये. याबाबत कुटुंबीयांना देखील सांगावं,” असंही या पत्रात सांगण्यात आलंय. या पत्रावरील आक्षेप आणि तक्रारीनंतर टीआयएफआरचे संचालक प्राध्यापक एस. रामकृष्णन यांनी या तक्रारी आणि आक्षेपांवर सोमवारी (१८ एप्रिल) उत्तर देणार असल्याचं म्हटलं.