नागपूर : देशातील व्याघ्र मार्गिकांचे सीमांकन करताना राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या (एनटीसीए) वैज्ञानिक मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करावे. केवळ ‘लीस्ट कॉस्ट पाथ’ मॉडेलवर अवलंबून राहू नये, अशी मागणी देशभरातील १३ संवर्धन संस्था आणि सात वन्यजीव तज्ज्ञांनी प्राधिकरणाकडे पत्राद्वारे केली आहे.
महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाने व्याघ्र मार्गिका निश्चित करताना प्राधिकरणाच्या विद्यमान मार्गदर्शक तत्त्वांना डावलून या पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल पत्रातून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. या निर्णयामुळे वाघांच्या दीर्घकालीन संवर्धनावर आणि वन्यजीव अधिवासांच्या सलगतेवर परिणाम होऊ शकतो, असेही नमूद करण्यात आले आहे.
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवांना २४ जुलैला पाठवण्यात आलेल्या पत्रात व्याघ्र मार्गिकांचे सीमांकन हे अद्ययावत वैज्ञानिक माहिती, प्रत्यक्ष क्षेत्रीय अभ्यास आणि विविध निकषांवर आधारित असावे, असे नमूद करण्यात आले आहे. व्याघ्र मार्गिका ही केवळ दोन अभयारण्यांना जोडणारी अरुंद पट्टी नसून वाघांच्या स्थलांतरासाठी, आनुवंशिक देवाणघेवाणीसाठी आणि वन्यजीवांच्या मुक्त हालचालीसाठी आवश्यक असलेले विस्तृत क्षेत्र असल्याचे पत्रात अधोरेखित करण्यात आले आहे.
प्राणी एका सरळ रेषेत किंवा एकाच मार्गाने प्रवास करत नाहीत. त्यामुळे केवळ या प्रणालीवर आधारित सीमांकन केल्यास महत्त्वाचे अधिवास विकास प्रकल्पांसाठी खुले होऊ शकतात. परिणामी मानव-वन्यजीव संघर्षात वाढ होण्याची भीतीही पत्रात व्यक्त करण्यात आली आहे.
यापूर्वीच्या शिफारशी
– प्राधिकरणाने २०२३मध्ये प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये व्याघ्र मार्गिका निश्चित करण्यासाठी टेलिमेट्री, आनुवंशिक माहिती, वाघांची उपस्थिती, कॅमेरा ट्रॅप, अधिवास मूल्यांकन आणि मानवी हस्तक्षेप अशा सहा निकषांचा वापर करण्याची शिफारस
– २०२२च्या अखिल भारतीय व्याघ्र गणनेच्या अहवालात अद्ययावत क्षेत्रीय माहिती आणि रिमोट सेन्सिंगच्या आधारे व्याघ्र मार्गिकांचे पुनर्मूल्यांकन करण्याची शिफारस
– सध्या प्राधिकरणाच्या ‘निर्णय सहाय्य प्रणाली’त वापरल्या जाणाऱ्या ‘लीस्ट कॉस्ट पाथ’ मॉडेलमध्ये वाघांचे प्रत्यक्ष स्थलांतर, अधिवासातील अडथळे, जंगलांची सलगता, आनुवंशिक जोडणी आणि मानवी दबाव यांसारख्या महत्त्वाच्या घटकांकडे दुर्लक्ष होत असल्याचा दावा
तांत्रिक सहकार्याची तयारी
प्राधिकरणाने आपल्या संकेतस्थळावरील व्याघ्र मार्गिकांचे नकाशे २०२२ च्या व्याघ्र गणनेतील अद्ययावत माहिती, व्याघ्र संवर्धन योजना आणि इतर वैज्ञानिक अभ्यासांच्या आधारे तातडीने अद्ययावत करावेत. सर्व राज्यांना प्राधिकरणाच्या बहुनिकषीय मार्गदर्शक तत्त्वांचे पालन बंधनकारक करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. आवश्यक असल्यास अद्ययावत संपर्कक्षमता असणारे नकाशे तयार करण्यासाठी आणि व्याघ्र संवर्धन आराखडे तयार करण्यासाठी तांत्रिक सहकार्य करण्याची तयारीही संवर्धन संस्था आणि तज्ज्ञांनी दर्शवली आहे. ही भूमिका कन्झर्व्हेशन इनिशिएटिव्ह्स, वाइल्डलाइफ कॉन्झर्व्हेशन ट्रस्ट, वाइल्डलाइफ ट्रस्ट ऑफ इंडिया, डब्ल्यूडब्ल्यूएफ-इंडिया, वाइल्डलाइफ कॉन्झर्व्हेशन सोसायटी-इंडिया यांसह १३ संस्था आणि सात स्वतंत्र वन्यजीव तज्ज्ञांनी संयुक्तपणे मांडली आहे.
